माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा आरोप
पिंपरी : भाजप सरकारने दोन वर्षात राज्याचा बट्ट्याबोळ केला असून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्मचारी काम करतात. तिथे ठराविक जातीचीच माणसे घेतली जात असल्याने देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी मुख्यमंत्री आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित दापोडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी पर्यटन राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, शहराध्यक्ष सचिन साठे, महिला अध्यक्षा ज्योती भारती, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राहुल भोसले आदी उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हा मेळावा घेण्यात आला. काँग्रेसची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
नारायण राणे म्हणाले की, देशात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने आश्वासने पाळली नाहीत. दोन वर्षात सरकारने काय काम केले याचा पंचनामा करण्यासाठी मी इथे आलो आहे. दोन वर्षापूर्वी लाटेत जनता वाहून गेली. आज शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी सर्वचजण बेजार झाले आहेत. स्वातंत्र्य लढ्यात भाजपचे काय योगदान होते. काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले. भाजप म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहे. राज्यातील मंत्रीमंडळाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारने दोन वर्षात केलेले काम दाखवावे आणि एक लाख रुपये मिळवावे. मुख्यमंत्री फडणवीस फक्त बोलतात, खोटे बोला पण रेटून बोला हाच त्यांचा अजेंडा आहे. मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्यातील जनतेचा असतो. तो त्या पदावर गेला की कोणत्या पक्षाचा नसतो, याचे भान फडणवीस यांनी ठेवायला हवे. अच्छे दिनचे आश्वासन देणार्या भाजपने दोन वर्षांत काय दिवे लावले ते सांगावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस जातीयवादी मुख्यमंत्री : राणे
