चौफेर न्यूज – अकरावीच्या आतापर्यंतच्या प्रवेशप्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करूनही गुणवत्ता यादीत नावच न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबविली जाण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांची बैठक पार पडणार असून या बैठकीत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबविण्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतच्या गुणवत्ता यादीत नावच न आलेल्या मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 6 हजारांपर्यंत असेल, असा अंदाज शिक्षण संचालक कार्यालयातून वर्तविण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना अकरावीत ऑनलाइन प्रवेश देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असून त्यासंर्दभात येत्या एक-दोन दिवसांत निर्णय जाहीर होणार आहे.
एसएससीच्या 38 हजार विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ
मुंबई विभागातील एसएससी बोर्डाच्या 38 हजार 120 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. एसएससी बोर्डाच्या 2 लाख 35 हजार 555 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते त्यांपैकी 1 लाख 97 हजार 435 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या 8,139 विद्यार्थ्यांपैकी 7,957 विद्यार्थ्यांना प्रवेश घेतले. आयसीएसई बोर्डाच्या 11 हजार 266 पैकी 10 हजार 550 तर आयबी बोर्डाच्या 12 पैकी 11, आयजीसीएसई बोर्डाच्या 1369 पैकी 1272, एनआयओएस बोर्डाच्या 1262 पैकी 975 आणि इतर बोर्डाच्या 1252 पैकी 985 विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेतले आहेत.





















