चौफेर न्यूज – मोफत शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 25 टक्के आरक्षण प्रवेशाची सोडत एप्रिल महिन्यामध्ये काढण्यात आली होती. पण, लॉकडाऊनमुळे कागदपत्रे पडताळणी रखडली. कागदपत्र तपासणी बाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे पालक संभ्रमावस्थेत आहेत. कागदपत्राची तात्काळ पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले यांनी केली आहे.
याबाबत चखाले यांनी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. ‘सीबीएसई बोर्डाच्या सर्व शाळांनी या शैक्षणिक वर्षाचे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या शाळेमध्ये आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाहीत.
तसेच, कागदपत्रे पडताळणी केंद्रावरील आम्हाला माहीती आली नसल्याचे तेथील अधिकारी सांगतात. यामुळे शिक्षण हक्क कायद्याचां मूळ उद्देश फोल ठरत आहे.’
‘शिक्षण विभागाने त्वरीत निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात शिक्षण खात्याने आपले पुढील धोरण जाहीर करावे व कागदपत्रे पडताळणी करून विद्यार्थ्यांचा लवकर प्रवेश निश्चित करावा’, अशी विनंती चखाले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





















