पिंपरी ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मागील तीन दिवसांपासून शहरातील सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांबाहेर बँकेत चलन जमा करण्यासाठी व बदलून घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, कामगार, रोजंदारीवर काम करणारे, हातगाडी, पथारीवाले, विद्यार्थी तसेच गृहिणींना सकाळपासूनच बँकेच्या रांगेमध्ये उभे राहून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तासन्तास रांगेत उभे राहून नागरिकांना पाणी मिळणे देखील कठीण झाले आहे. यातून त्यांना दिलासा मिळावा म्हणून पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या वतीने शहरातील सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांबाहेर रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना पिण्याचे पाणी आणि तात्पूरता निवारा देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पत्रक शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक तसेच आजी, माजी नगरसेवक, युवा सेनेचे कार्यकर्ते, विद्यार्थी सेना, कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.