भोसरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी अभियान
महाराष्ट्रातील ‘आदर्श’ मतदारसंघ बनविण्याचा संकल्प
भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या प्रेरणेतून ‘भोसरी व्हीजन- 2020’ हे महत्त्वाकांक्षी अभियान आमदार महेश लांडगे यांनी हाती घेतले आहे. या अंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातील आदर्श विधानसभा मतदार संघ बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात भोसरी हे विकासाचे ‘रोल मॉडेल’ ठरेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, पुणे शहर भाजपा खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार बाळा भेगडे, लोक लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत सोमवारी 28 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहा शेजारी असलेल्या मैदानावर या अभियानाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांनी देशाला 2020 पर्यंत विकासित राष्ट्र बनविण्यासाठी एक स्वप्न पाहिले होते. त्याला सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी काही सूचनाही केल्या होत्या. डॉ. कलाम यांनी त्याबाबत प्रकल्पही तयार केला होता. तब्बल 500 तज्ज्ञांच्या टीमच्या मदतीने डिपार्टमेंट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नोलॉजीच्या अंतर्गत ‘इंडिया व्हीजन-2020’ हा पहिला प्रबंध तयार करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. कलाम यांनी ‘इंडिया 2020 : ए व्हीजन फॉर द न्यू मिलेनियम’ हे पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकात भारताला बलशाली आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी पंचसूत्रीचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये कृषि आणि अन्न प्रक्रिया, मुलभूत पायाभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य, माहिती आणि तंत्रज्ञान विकास, तसेच आण्विक तंत्रज्ञानाचा विकास या पाच प्रमुख बाबींचा समावेश आहे. डॉ. कलाम यांचे 27 जुलै 2015 रोजी निधन झाले. मात्र, त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी खारीचा वाटा म्हणून डॉ. कलाम यांच्या प्रेरणेतून ‘भोसरी व्हीजन-2020’ हे महत्त्वाकांक्षी अभियान परिसरातील सर्व नागरिकांच्या सहभागाने हाती घेत आहे.
‘भोसरी व्हीजन-2020’
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती कार्यपद्धतीने प्रेरित होवून ‘भोसरी व्हीजन-2020’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान राबविण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भोसरीसह उद्योगनगरीतील सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी औद्योगिक परिसराचा विकास, मुलभूत पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य, माहिती आणि तंत्रज्ञान विकास हा पंचसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याव्दारे भोसरीतील सर्वसामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावण्यास मदत होईल. तसेच, बेरोजगारी कमी होवून गुन्हेगारीला आळा घातला येईल. परिणामी, भोसरी विधानसभा मतदार संघातील सामाजिक स्वास्थ सुदृढ राहणार आहे. यासाठी जनसंपर्क कार्यालयाअंतर्गत या विषयातील तज्ज्ञ आणि 30 कर्मचारी कार्यरत राहणार आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
पंचसूत्रीची संकल्पना
1) औद्योगिक विकास : भोसरी विधानसभा मतदार संघातील ‘एमआयडीसी’ सह अन्य उद्योग-व्यावसायांना चालना देणे. औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर निर्णय घेऊन नवीन उद्योग- व्यावसायांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे. त्याबाबत एमआयडीसी, महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नियोजनबद्ध कार्यक्रम आखणे.
2) इन्फ्रास्ट्रक्चर : मेट्रो आणि मोनो रेल, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर, पुणे-नाशिक महामार्ग, रिंग रोड, न्यायालयासाठी अध्ययावत इमारत, संतपीठ, डिअर सफारी पार्क, बीआरटी रस्ते, कच-यापासून वीज निर्मिती, सांडपाणी पुर्नवापर प्रकल्प, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा मैदान, नेत्र रुग्णालय, वाहतूक नियोजन यासह अतिक्रमण, रेडझोन, बफर झोन यासह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
3) पर्यावरण संवंर्धन : ‘ग्रीन-भोसरी-क्लिन भोसरी’ अभियान, नदी सुधार प्रकल्प, प्रदूषणमुक्त परिसर, वृक्षारोपण आणि जतन, नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन, औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण, जनजागृती, नैसर्गिक प्रवाहांची स्वच्छता आणि संवर्धन यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
4) गुणवत्तापूर्ण शिक्षण : भोसरीतील शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांच्या समस्यांबाबत समिती नेमूण अहवाल तयार करुन अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्य व केंद्र सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करणे. ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण’ ही संकल्पना राबविणे. तसेच, कौशल्य विकास अभियानाअंतर्गत बेरोजगारी कमी करुन गुन्हेगारीमुक्त भोसरी करणे. शिक्षणाच्या नवीन संधी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. तसेच, महापालिका, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील विद्यार्थ्यांना मिळवून देणे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रमांची आखणी करणे.
5) पायाभूत सुविधा : पाणी पुरवठा सुरळीत करणे, आरोग्य सुविधा व सुरक्षा व्यवस्था सक्षम करणे. यासह प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरण, वीज पुरवठा, व्यावसायिक व लघुउद्योजकांसाठी आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे.