चौफेर न्यूज – चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”गेले अनेक दिवस लक्ष्मण जगताप कर्करोगावर उपचार घेत होते. दीर्घ आजाराने त्यांचे आज निधन झाले. अतिशय कमी वयात नगरसेवक ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, शहराचे महापौरपद त्यांनी भूषविले. विधानपरिषद आणि विधानसभेचेही ते आमदार झाले. लक्ष्मण जगताप हे शहराचे महापौर असताना मी महापालिका स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. काही काळापुरते राजकीय मतभेद असतील. परंतु, पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत, विकासात त्यांचे मोठे योगदान होते. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. गेली अनेक दिवस ते आजारी होते. त्या आजारावर ते मात करतील असे वाटत होते. परंतु, मागील काही दिवसांपासून पुन्हा ते रुग्णालयात दाखल होते. त्यांनी केलेले कार्य, त्यांचा असलेला सहवास पिंपरी-चिंचवकरांच्या लक्षात राहील. त्यांच्या जाण्याने शहराची मोठी हानी झाली आहे. कर्ततृत्वान नेता काळाच्या आड गेला आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने, मावळ मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो”.