पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय कोलांटउड्या सुरु झाल्या आहेत. डिसेंबर महिन्यात भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेले सुमारे 30 नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर शहरातील राजकारण चांगलेच तापणार आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर भाजपने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचे शिलेदार असलेले आमदार लक्ष्मण जगताप मोदी लाटेत स्वार होण्यासाठी भाजपात दाखल झाले आणि भाजपच्या उमेदवारीवर निवडून येवून शहरातील भाजपचा प्रथम आमदार होण्याचा मानही मिळविला.
राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांना आपले वाटणारे भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी दोन वर्षानंतर भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. 27 नोव्हेंबर रोजी त्यांच्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त ते मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
भोसरी येथील गावजत्रा मैदानात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात त्यांचे विविध पक्षांतील सुमारे दहा समर्थक नगरसेवक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
भोसरी मतदार संघातील जागा वाटपाचे अधिकार आणि शिवसेनेशी युती नाही या दोन मुद्यांवरच आमदार लांडगे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी युतीसाठी अनुकूल असल्याचे सांगत असले, तरी युती होईल की नाही याबाबत साशंकता आहे. तर, शिवसेना आणि भाजपची युती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेवरील सत्तेची हॅट्रीक करणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना – भाजपची 25 वर्षांची युती तुटली, त्यानंतर दोन्ही पक्षांना ऐनवेळी उमेदवारांची शोधमोहीम राबवावी लागली. भाजपच्या अनेक उमेदवारांना मोदी लाटेत स्वार होत आमदारकीची लॉटरी लागली. तर, शिवसेनेचेही 63 आमदार निवडून आले. कालांतराने शिवसेना भाजपसोबत सत्तेत सामील झाली असली तरी दोन्ही पक्ष मनाने एकत्र आल्याचे दिसून येत नाही. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष युतीसाठी अनुकूल असल्याचे सांगत असले तरी ऐनवेळी युती झाली नाही तर स्वतंत्रपणे लढण्याचीही तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे.