पुणे : म्हाडाच्या पुणे विभागातर्फे 2503 सदनिका व 67 भूखंडांच्या विक्रीच्या ऑनलाईन सोडतीसाठी 31 हजार नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे. सदर सोडत गुरुवार, दि. 24 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता पुण्याच्या स्वारगेट येथील श्री गणेश कला व क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाचे मुख्य अधिकारी अशोक काकडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
म्हाडाच्या पुणे विभागातर्फे 2503 सदनिका आणि 67 भूखंडांच्या विक्रीसाठी 5 सप्टेंबर, 2016 रोजी जाहिरात देण्यात आली होती. सदर जाहिरातील अनुसरून अंदाजे 31 हजार नागरिकांनी अनामत रक्कम भरून सोडतीसाठी सहभाग नोंदवला आहे.
ऑनलाईन सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडा लॉटरीच्या वेबसाईटवर होणार आहे. यशस्वी झालेल्या विजेत्या लाभार्थ्यांची यादी प्रतिक्षा यादी सोडतीच्या ठिकाणी, म्हाडा पुणे येथील विभागीय कार्यालय व म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.