धुळे : जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील एकूण 596 खरीप गावे व 80 रब्बी गावे असे एकूण 676 गावांची सुधारीत हंगामी आणेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 351 गावांची आणेवारी 50 पैसे व त्यापेक्षा कमी असून 325 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा अधिक असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिंदखेडा तालुक्यातील सर्वच्या सर्व 143 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे.सुधारीत हंगामी आणेवारी जाहीर.
डिसेंबर अखेर अंतिम यादी जाहीर होणार धुळे जिल्हा खरिपाचा जिल्हा असून यात 80 रब्बी गावांचा समावेश आहे. रब्बी गावांमध्ये खरिपाचा 80 टक्के पेरा झाला असल्याने रब्बी गावांचीही सुधारीत हंगामी आणेवारी खरिपात जाहीर केलेली आहे. जिल्ह्यात एकूण 676 गावांचा समावेश आहे. मात्र, धुळे तालुक्यातील दोन गावे ही बिनशेतीकडे व पाझर तलावाकडे वर्ग झालेली असून शिरपूर तालुक्यातील एक गाव उजाड झालेले आहे. त्यामुळे या तीन गावांची सुधारीत हंगामी आणेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
सुधारीत हंगामी आणेवारीनुसार जिल्ह्यातील 51 टक्के म्हणजेच 351 गावांची आणेवारी 50 पैशांच्या आत आहे. तर 325 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा आधिक आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे या गावांची अंतिम यादी डिसेंबर अखेर जाहीर केली जाणार आहे. यामुळे कमी आणोवारीचे लाभ मिळविण्यास जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरणार आहेत.
तालुकानिहाय गावांची संख्या
धुळे तालुक्यात एकूण 170 गावे आहेत. पैकी दोन गावे बिनशेती व पाझर तलावाकडे वर्ग झाली आहेत. त्यामुळे उर्वरीत 168 गावांपैकी 82 गावांची आणेवारी 50 पैसे व त्यापेक्षा कमी तर 86 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आहे. साक्री तालुक्यात एकूण 227 गावे असून पैकी 126 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी तर 101 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आहे. शिंदखेड्यात एकूण 143 गावे असून सर्वच्या सर्व गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तर शिरपूर तालुक्यात एकूण 139 गावे असून पैकी एक गाव उजाड झाले आहे. तर 138 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा अधिक असल्याचे या सुधारीत हंगामी आणेवारीत दिसून येते.