पिंपरी :- चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उपाध्यक्षा जागृती धर्माधिकार, शरदचंद्र धारोडकर यांच्या उपस्थितीत तेराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शहर इंग्रजी माध्यम युनिटमध्ये संदीप काटे कार्यरत असून पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या इंग्रजी माध्यम शिक्षण संस्था मंडळाच्या सर्व कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शिक्षण संस्था महामंडळास देत असलेले योगदान लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड शहर इंग्रजी माध्यम शाळा संस्था चालक संघटनेच्या सभेत संदीप काटे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.
महामंडळाच्या कार्यात या पुढे ही सक्रिय राहतील, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. संदीप काटे हे गेली अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. शैक्षणिक धोरण व संस्था चालकांच्या अडचणी यावर त्यांनी कायम पुढाकार घेतला आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. या पदाच्या माध्यमातून देखील ते सुनियोजित कारभार करतील असा विश्वास व्यक्त होत आहे. निवडीनंतर काटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.