पुणे : बेकायदेशिर बाईक टॅक्सीविरोधात पुकारलेल्या चक्काजाम रिक्षा आंदोलनादरम्यान आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करून सर्व नागिरकांना तसेच आरटीओंच्या अधिकाऱ्यांसोबतच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे दुर्लक्ष करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याप्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेच्या अध्यक्षांसह ३७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, यामध्ये इतर संघटनांचे देखील अध्यक्ष व इतर रिक्षा चालक आहेत.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादवी कलम ३५३, १४३, १४५, १४७, १४९, ३३६, ३४२, १८८ व क्रिमिनल लॉ. अमेंडमेंट कायदा कलम ३, ७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बघतोय रिक्षावाला फोरमचे अध्यक्ष, आम आदमी रिक्षा चालक संघटना, पुणे जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष, आरपीआय वाहतूक आघाडी, पी आर्शिवाद रिक्षा संघटना यासह इतर संघटना तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
रॅपीडो बाईक टॅक्सी बंद होण्यासाठी आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले. तत्पुर्वी पोलिसांकडून या आंदोलनासंदंर्भात बैठक घेऊन ते न करण्यासाठी सांगण्यात आले होते. तशी नोटीस देखील त्यांना बजावण्यात आली होती. तर, बाबा आढाव यांनी देखील हे आंदोलन न करण्याबाबत सांगितले होते. तरीही संघटनांकडून आरटीओ कार्यालयासमोर बेकायदेशीर आंदोलन केले. या आंदोलनात साडे नऊच्या जवळपास रिक्षा चालक सहभागी झाले होते. त्यांनी रिक्षाच चौकात लावून वाहतूकीला अडथळा निर्माण केला.आरटीओच्या गेटसमोर आंदोलन केल्याने कार्यालयीन व शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. त्यासोबतच शाळा तसेच रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला. या आंदोलनादरम्यान पोलीस वाहतूक सुरळीत करू लागले असता पोलिसांच्या अंगावर आंदोलक धावून गेले. पोलिसांनी यानंतर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉ. केशव क्षिरसागर यांच्यासह तब्बल ३७ जणांना अटक केली. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
रिक्षांची तोडफोड.. !
बेकायदेशिर बाईक टॅक्सीविरोधात पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षाची तोडफोड केल्यावरून रिक्षा संघटनेचे अध्यक्षांसह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उदय चंद्रकांत शिर्के (वय ४६) यांनी तक्रार दिली आहे. सोमवारी दुपारी नवले-ब्रिज कात्रज रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.
पुण्यातील बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात बघतोय रिक्षा संघटनेसह रिक्षा चालकांनी चक्का जाम रिक्षा बंद आदोलन पुकारले होते. पण, त्यांनी रिक्षा चालकांना विश्वासात न घेता हे आंदोलन पुकारल्याने काही रिक्षा बंदमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षिरसागर व इतरांनी सहभागी न झालेल्या रिक्षांवर लक्ष ठेवून तसेच रिक्षा मिळून आल्यास त्या फोडून टाका व जाळून टाका, सोडू नका कोणाला असे चिथावणी दिली. त्यामुळे अज्ञात तीन ते चार जणांनी तक्रारदार प्रवासी घेऊन जात असताना त्यांची रिक्षा अडवून त्याची तोडफोड केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.