मुंबई : सध्या सीबीएसई (CBSE) ते सीआयएससीई (CISCE) २०२३ परीक्षेचे वेळेपत्रक जाहीर झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावरून CBSE 2023 चे वेळापत्रकही व्हायरल होत असून विद्यार्थी देखील या वेळापत्रकावर विश्वास ठेऊन यानुसार पुढचे नियोजन करीत आहेत. मात्र ही बातमी केवळ अफवा असून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर काही जण अशा बातम्या पसरवत असल्याचं समोर आलं आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने यासंदर्भात एक नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यात म्हटलंय की, परीक्षांच्या वेळापत्रकाच्या अनेक आवृत्त्या प्रसारित केल्या जात आहेत, ज्या बनावट आहेत. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांनी याबाबत माहितीची प्रतीक्षा करावी. सध्या, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्या जाणार्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2023 च्या परीक्षेच्या तारखा बनावट आहेत, असे सीबीएसईने म्हटलं आहे.
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार बोर्डाची डेटशीट लवकरच प्रसिद्ध केली जाईल, ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना तपासता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना फक्त अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती पुढे व्हायरल करण्याचंही काम करू नका. असे स्पष्ट करण्यात आलं आहे.
या तारखे पासून सुरु होणार परीक्षा ?
CBSE ने नुकतीच 10वी आणि 12वी च्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारीपासून होणार आहेत. दुसरीकडे, 15 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, याचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच अधिकृत वेबसाइटवर तपासून घ्यावे असे आवाहन सीबीएसई कडून करण्यात आलं आहे.