पिंपरी:- तांत्रिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी बदलत्या स्पर्धात्मक युगात आवश्यक असणाऱ्या आधुनिक नवतंत्रज्ञानाची माहिती घेऊन ते ज्ञान आत्मसात केले पाहिजे. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाबद्दल अवगत करण्यासाठी महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी औद्योगिक कंपन्यांच्या संपर्कात राहणे गरजेचे असून त्यांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रमाणात रोजगारभिमुख कोर्सेस राबवावेत, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केली.
सँडविक कोरोमंट कंपनीच्या वतीने त्यांच्या सीएसआर प्रोग्राम प्रोजेक्ट अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मशीनरी सेटअप देण्यात आले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील बोलत होते. विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रामध्ये करिअरच्या विविध संधीबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सँडविक कोरोमंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक किरण आचार्य, स्किल सोनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्नजीत कुंडू, महापालिका सी.एस.आर. कक्षाचे सल्लागार विजय वावरे, सँडविक कंपनीच्या प्रतिनिधी रोशनी आचार्य, योगेश बाविस्कर, कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या गटनिदेशक शर्मिला काराबळे, निदेशक पूनम गलांडे, बबिता गावंडे, सोनाली नीलवर्ण, वंदना चिंचवडे, मनसरा कुमावनी, हेमाली कोंडे, सिद्धार्थ कांबळे, कार्यालयीन कर्मचारी जया जाधव यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थीनी उपस्थित होते.
कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस सँडविक कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल या ट्रेडसाठी ६ नग अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स वर्क स्टेशन्स दिले असून विद्यार्थ्यांकरिता मेकॅट्रॉनिक्स तसेच फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजी बाबत प्रशिक्षण देखील दिले आहे.
दरम्यान, करिअरमध्ये तांत्रिक क्षेत्रामध्ये पुढे जाण्याविषयी सँडविक कोरोमंट कंपनीचे किरण आचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले तर योगेश बाविस्कर यांनी आभार मानले.