पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी भक्ती-शक्ती उद्यान सर्वात महत्वाचे ठिकाण असून भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे स्मरण करून देणारे उर्जास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वगुणसंपन्न शक्ती व श्री संत तुकाराम महाराजांची निष्काम भक्ती व असंख्य स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानातून अभिमानाने उंचावलेला व राष्ट्रभक्ती जागृत करणारा राष्ट्रध्वज असा त्रिवेणी संगम या ठिकाणी साकार झालेला आहे. असे हे उर्जास्थान सन २००० मध्ये लोकार्पण करण्यात आल्यापासून विकासापासून वंचित राहिले आहे. भक्ती-शक्ती उद्यान अनेकांचे प्रेरणास्थान आहे, परंतु भक्ती-शक्ती उद्यानाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झालेले आहे.
भक्ती-शक्ती उद्यान व परिसराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तरी महापालिका प्रशासनाने त्वरित येथील दुरुस्ती तथा सुशोभीकरण करावे. अन्यथा मनसेच्या वतीने संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.
सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भक्ती शक्ती उद्यानाचे सन २००० मध्ये लोकार्पण करण्यात आल्यापासून विकासापासून वंचित राहिले आहे. भक्ती-शक्ती उद्यान अनेकांचे प्रेरणास्थान आहे, परंतु भक्ती-शक्ती उद्यानाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झालेले आहे.
खालीलप्रमाणे कामे आपण लवकरात लवकर करून घ्यावीत ..
१.भक्ती-शक्ती उद्यानातील साउंड सिस्टीम गेली ५ वर्ष बंद आहे.
२.भक्ती-शक्ती उद्यानातील स्मारकाभोवती S.S. मटेरीअल मध्ये राउंड ग्रिल बसविणे.
३.भक्ती-शक्ती उद्यानातील पिण्याच्या पाण्याची टाकी लहान असल्यामुळे नागरिकांना पाणी पुरत नाही, त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
४.भक्ती-शक्ती उद्यानात संडास बाथरूम नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (विशेषतः महिलांसाठी)
५.भक्ती-शक्ती उद्यानातील सीमाभिंत पडलेल्या अवस्थेमध्ये आहे याकडे दुर्लक्ष आहे.
६.भक्ती-शक्ती उद्यानातील नवीन जनरेटर घेतलेला आहे, परंतु तो बंद अवस्थेमध्ये आहे, त्याची सध्याची क्षमता १५ K.V. असून तो कमीत कमी ५० K.V. असणे अपेक्षित आहे.
७.भक्ती-शक्ती उद्यानातील स्माराकाभोवतीचे सर्व ग्रेनाइट तुटलेले अवस्थेमध्ये आहे.
८.भक्ती-शक्ती उद्यानातील स्मारकाभोवतील आवारात रात्री सर्व ठिकाणी अंधार असतो, त्यामुळे गैरसोय होते.
९.भक्ती-शक्ती उद्यानातील भगवा झेंडा आकाराने मोठा करण्यात यावा.
१०.भक्ती-शक्ती उद्यानातील स्मारकास हार घालण्यासाठी मागून शिडी तयार करण्यात यावी.
११.भक्ती-शक्ती उद्यानातील स्मारक आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे.
अशा विविध प्रकारच्या कामांपासून भक्ती-शक्ती उद्यान वंचित राहिलेले आहे. त्यामुळे शहरातील सर्व शिवभक्त व वारकरी मंडळीमध्ये नाराजीचा सूर आहे.
भक्ती-शक्ती उद्यानाचे काम संपूर्ण दगडी बांधकामात व किल्ल्यासारखे बुरुज करावे. लवकरात लवकर भक्ती-शक्ती उद्यानाचे सुशोभिकरण करावे. तसेच भक्ती-शक्ती उद्यानाची विटंबना होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.