पिंपरी :- दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बासुरी बँक्वेट हॉल, हॉटेल गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर याठिकाणी समस्त पिंपळे सौदागर रहाटणी रहिवासीयांच्या वतीने (रविवार दि.०८) रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मंगळवारी ३ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. त्यांची दीर्घ आजाराशी सुरु असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मावळली.
पिंपळे सौदागर रहाटणी परिसरात दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली बरीच विकासकामे मार्गी लागली. या परिसराचा कायापालट करण्यात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच प्रभागात स्मार्ट सिटी प्रकल्प, उद्याने, मैदाने, रस्ते, साई चौक ग्रेड सेपरेटर आदिसारखी अनेक विकास कामे पूर्णत्वास आली असे मत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आदरांजली वाहताना व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड शहराचा विकास करणारे, शहराचे ज्वलंत प्रश्न मांडून त्यासाठी लढणारे कणखर नेतृत्व कायमस्वरूपी आपल्यामधून निघून गेले. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आपल्या राजकीय जीवनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती तसेच महापौरपदही भूषविले होते. तसेच विधानपरिषदेचे सदस्यही राहिले आणि सध्या ते विधानसभेचे विद्यमान आमदार म्हणून अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने राजकारणातील कधी हि न भरणारी अशी पोखळी निर्माण झाली आहे.
या शोकसभेत उपस्थित नागरिकांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींचा उजाळा दिला. आणि यापुढे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे आपल्याला परत कधीही दिसणार नसले तरीपण कायम ते आपल्या आठवणीत व मनात राहतील. या मनोवृत्तिने मनापासून श्रद्धांजली वाहत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी देवाकडे प्रार्थना केली.