पिंपरी – राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता महापालिकांमध्ये एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा दहा स्वीकृत नगरसेवक यांपैकी जी संख्या छोटी असेल त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विचार करता आता १० स्वीकृत नगरसेवकांची निवड करावी लागणार आहे. सध्या ही संख्या ५ वर होती. राज्य सरकारच्या निर्णयामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत दुप्पट वाढ होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या १० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लहान महानगरपालिकांमध्ये सदस्या संख्येच्या १० टक्के स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात.
महापालिकेत एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात किंवा दहा स्वीकृत नगरसेवक स्वीकृत म्हणून निवडता येतील. यापैकी जी संख्या छोटी असेल त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड करण्याच्या सुधारणेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आता महापालिकांमध्ये ५ नाही तर १० स्वीकृत नगरसेवक असतील.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विचार करता महापालिकेत सध्या ५ स्वीकृत नगरसेवक निवडण्याची कायदेशीर तरतूद होती. आता निवडणुका झाल्यानंतर १० स्वीकृत नगरसेवक निवडता येतील. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.