नागपुरातील बैठकीला निघताना ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नागपूर- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड यांचे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते. त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रीतिश हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे. बुधवारी (दि 11) नाशिकच्या काँग्रेस भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता नाशिक अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जयप्रकाश जितमल छाजेड यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. तरीही ते नागपूर येथे काँग्रेसच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते, कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजीही व्यक्त केली. त्यानंतर काही वेळातच छाजेड यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना कुटुंबीयांनी नाशिकमधीलच एका खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथेच त्यांनी प्राण सोडले. छाजेड यांच्या मृत्यूची बातमी समजताच नागपूरला कॉंग्रेसच्या बैठकीसाठी गेलेले सर्व पदाधिकारी नाशिकला परतले
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असे त्यांचे घराणे होते युवक काँग्रेस पासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांनी पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते जवळचे सहकारी होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती नाशिकच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक चळवळीतील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते.