पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर अपर्णा डोके यांचे पती नीलेश डोके यांना एकाने ३५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना २० फेब्रुवारी २०२१ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत रावेत, शिंदेवस्ती येथील ओवी भारत गॅस एजन्सीत घडली.
याप्रकरणी नीलेश चंद्रकांत डोके (४५, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, श्रवणकुमार मोहनराम मांजू बिष्णोई (सध्या रा. गायकवाड चाळ, जांबे, ता. मुळशी, मूळ रा. मंडलाकाला, ता. देचू, जि. जोधपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नीलेश डोके यांची रावेत येथे ओवी भारत गॅस एजन्सी आहे. एजन्सीत मिळणारी रक्कम दररोज ऑफिसच्या अकाउंटवर जमा करण्याचे काम आरोपी श्रवणकुमार विष्णोई याला दिले होते. मात्र, आरोपीने दुकानात दररोज मिळणारी रक्कम ऑफिसच्या अकाउंटवर जमा केली नाही. तसेच, ऑनलाईन पद्धतीने मिळणारी रक्कम ओवी भारत गॅस एजन्सीची असल्याचे भासवत स्वतःच्या भावाच्या व पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर ही रक्कम जमा करून घेऊन फिर्यादी यांची ३५ लाख रुपयांची फसवणूक केली. रावेत पोलिस तपास करत आहेत.