- मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त शेखर सिंह यांची माहिती
- प्रकल्पामुळे स्मार्ट सिटी कंपनी स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल
पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत “रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल” हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. देशातील कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प राबविण्यात आलेला नसून या स्वरुपाचा पथदर्शी प्रकल्प देशामध्ये प्रथमच पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत राबविण्यात आला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. सदर निविदा प्रक्रिया ही स्पर्धात्मक पध्दतीने आणि अत्यंत पारदर्शीपणे पार पाडण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षापासून स्मार्ट सिटी कंपनीला केंद्र व राज्य शासनाकडून कुठलाही निधी प्राप्त होणार नसून सदर प्रकल्पामुळे स्मार्ट सिटी कंपनी स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. तसेच, महापालिकेवरील आर्थिक भार कमी होणार आहे, असेही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीमार्फत सूरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यासाठी मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीच्या कै. मधुकरराव पवळे सभागृहात पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी, स्मार्ट सिटी सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, उपायुक्त अजय चारठणकर, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख रविकिरण घोळके, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्मार्ट सिटी योजना दि. २५ जून २०१५ रोजी घोषित करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी चॅलेंजच्या तिस-या फेरीमध्ये भारत सरकारकडून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीची निवड झाली असून, १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांचे कामकाजाकरीता केंद्र शासन, राज्य शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यात येत आहे.
शहरामध्ये एकूण ६००किमी अंतराचे Optical fiber Network व सतराशे पोल्य चे जाळे
- केंद्र शासनाचे मार्गदर्शन सूचनांनुसार स्मार्ट सिटी अंतर्गत ऑप्टिकल फायबर नेटवर्क हा प्रकल्प देखील राबविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी ऑप्टीकल फायबर नेटवर्क सिस्टीम हे स्मार्ट सिटीच्या पायाभूत सुविधांमधील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. स्मार्ट सिटी घटकांना परस्परांशी जोडण्यासाठी आणि अद्ययावत व योग्य कृतीसाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचा पुरवठा करण्यामध्ये स्मार्ट सिटी फायबर ऑप्टीकल नेटवर्क सिस्टीमची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली स्मार्ट उपकरणे (उदा. सीसीटीव्ही कॅमेरे, सिटी वायफाय, स्मार्ट किओक्स आणि डिस्प्ले बोर्ड (VMD), स्मार्ट ट्रॅफीक, स्मार्ट पार्कीग ) सिटी नेटवर्कच्या माध्यमातून Integrated command & control centre (ICCC) ला जोडण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत शहरामध्ये एकूण ६००किमी अंतराचे Optical fiber Network व सतराशे पोल्य चे जाळे टाकण्यात आले आहे. भविष्यात या प्रकल्पाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी कंपनीस उत्पन्न मिळणार आहे. तसेच वारंवार होणा-या गैरसोयीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. ही पायाभूत सुविधा खूप मोठी असून डक्ट आणि केबल्सद्वारे महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीसाठी महसूल मिळवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.
City Network Infrastructure उद्योगातील दूरसंचार विषयतज्ञ/ जाणकार यांचेद्वारे पडताळणी
- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने सुरुवातीला १५ मार्च २०२१ रोजी संबंधित उद्योग क्षेत्रातील विविध कंपन्यांकडून याबाबत कल्पना जाणून घेण्यासाठी आणि City Network Infrastructure च्या माध्यमातून उत्पन्नासाठी स्वीकारल्या जाऊ शकणार्या विविध मॉडेल्सची चाचपणी करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ३ मे २०२२ रोजी विविध पर्यायावर चर्चा करण्यासाठी आणि PCSCL ने स्वयं-व्यवस्थापित थेट भाडेपट्टीवर, विक्रीसाठी जावे किंवा सवलतधारकाची (concessionaire) नियुक्ती करावी, हे ठरवण्यासाठी City Network Monetization Committee समिती देखील स्थापन करण्यात आली. City Network Infrastructure उद्योगातील दूरसंचार विषयतज्ञ/ जाणकार (BSNL, BBNL आणि डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DoT) मधील सेवानिवृत्त अधिकारी यांचे १० मे २०२२ रोजी नामांकन करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल तयार करण्यात आले आहे.
तीनही निविदाधारकांना पूर्व अर्हतासाठी पात्र ठरवून तांत्रिक सादरीकरण
- “रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल” कामाची निविदा दि.०५/०८/२०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या e-Procurement (http://mahatenders.gov.in) या वेबसाईट वर प्रसिद्ध करणेत आलेली होती. सदर कामाच्या निविदेस चार वेळा मुदतवाढ देणेत आलेली होती. या निविदेचे लिफाफा क्र.१ (तांत्रिक निविदा) दि.१२/१०/२०२२ रोजी उघडण्यात आले होते. यामध्ये मे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., मे. सुयोग टेलेमॅटीक्स लि., आणि मे. UCN केबल नेटवर्क लि. या कंपनींकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त निविदाधारकांमार्फत (Bidders) सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी व तपासणी स्मार्ट सिटी व प्रकल्प सल्लागार यांचे मार्फत करणेत आली आहे. तसेच, निविदा अटी शर्ती प्रमाणे सहभागी निविदाधारकांनी त्यांना कोणत्याही शासकीय / निमशासकीय संस्था किंवा कार्यालय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी काळया यादीत समाविष्ट नसलेबाबत अथवा निविदेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध नसलेबाबत हमीपत्रे घेण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे दि.२८/११/२०२२ रोजी तीनही निविदाधारकांना पूर्व अर्हतासाठी पात्र ठरवून तांत्रिक सादरीकरण (Technical Presentation) आमंत्रित करून City Network Monetization Committee पुढे सादरीकरण करण्यात आले होते. सदर कमिटी मार्फत निविदाधारकांनी सादर केलेल्या तांत्रिक सादरीकरण साठी निविदा अटी-शर्ती नुसार गुणांकन देण्यात आलेले असून तांत्रिक सादरीकरण गुणांकाचा तपशील http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. यावर निविदाधारकांचे आक्षेप असल्यास आक्षेप सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. सहभागी निविदाधारकांपैकी एकाही निविदाधारकाने छाननीबाबत कुठलाही आक्षेप दाखल केले नाहीत.
वार्षिक महसूलाच्या १०८ % म्हणजेच ३२.४ कोटी व अतिरिक्त उत्पन्नाच्या २१ टक्के महसूल़ मिळणार
- मे. सुयोग टेलिमॅटिक्स लि. In consortium with फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. लि. या निविदाधारक कंपनीने किमान आश्वासित वार्षिक महसूलाच्या १०८ % म्हणजेच ३२.४ कोटी व अतिरिक्त उत्पन्नाच्या २१ टक्के महसूल़ स्मार्ट सिटीला देणेबाबत निविदा सादर केलेली असून ही निविदा Highest 1 (H1) म्हणून जाहिर करण्यात आलेली आहे. त्यानुसार, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत काढण्यात आलेल्या सिटी नेटवर्क मॉनिटायझेनच्या निविदेसाठी प्राप्त ठरलेल्या मे. सुयोग टेलिमॅटीक्स लिमिटेड या निविदाधारक कंपनीस दि. २३ डिसेंबर २०२२ रोजीच्या स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या २१ व्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कंपनीसोबत वाटाघाटी करून देकार अंतिम करण्यात येवून मे. सुयोग टेलिमॅटिक्स लि. In consortium with फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांना Letter of Intent (LOI) दि. १२/०१/२०२३ रोजी देण्यात आला आहे.
कंपनीकडून खुलासा प्राप्त
- सर्वाधिक बोलीचा देकार देणा-या मे. सुयोग टेलिमॅटिक्स लि. In consortium with फायबर स्टोरी कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांच्या संदर्भात काही तक्रारी या कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने कंपनीकडून खुलासा मागविण्यात आलेला होता. कंपनीकडून खुलासा व त्या संदर्भातील कागदपत्रे नुकतीच प्राप्त झालेली आहेत. कंपनीकडून प्राप्त खुलाश्यानुसार कंपनीच्या विद्यमान संचालकांची नावे दि. ०४/१२/२०२१ रोजीच्या FIR, CR No. |-11191011210152 of 2021 मध्ये नमूद नाहीत. या FIR मध्ये ड्वेन परेरा या व्यक्तीचे नाव नमूद असून FIR दाखल झालेल्या दिनांकास ही व्यक्ती कंपनीच्या संचालक पदावर कार्यरत नसून सदर व्यक्तीने दि. २९/११/२०२१ रोजी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच, रियाज अब्दुल अजीज शेख या व्यक्तीचे नाव सदर FIR मध्ये नमूद नाही आणि या व्यक्तीने कंपनी संचालक पदाचा राजीनामा दि. २९/११/२०२१ रोजी दिलेला आहे. कंपनीच्या खुलाश्यानुसार रियाज अब्दुल अजीज शेख याचेकडे कंपनीचे कोणतेही इक्वीटी शेअर्स नाहीत. ड्वेन परेरा याचेकडेही कंपनीचे इक्वीटी शेअर्स नाहीत. परेरा या व्यक्तीकडे कंपनीचे काही प्रेफरन्स शेअर्स आहेत. तथापि, प्रेफरन्स शेअर्स होल्डर यांना कंपनी कामकाजात मताचा अधिकार अथवा कंपनी व्यवस्थापनात कोणताही अधिकार नसतो. या कार्यालयाकडील प्राप्त तक्रारीमधील FIR हा दि. ०४/१२/२०२१ रोजीचा असून रियाज शेख व ड्वेन परेरा यांनी दि. २९/११/२०२१ रोजी कंपनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने राबविलेली निविदा प्रक्रीया ही त्यानंतरची असून निविदा प्रसिध्दीची दि. ०५/०८/२०२२ रोजीची आहे, असेही त्यांनी सांगितले.