भारतीय कामगार सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी
पिंपरी : कामगार नेते इरफान सय्यद यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सय्यद यांची भारतीय कामगार सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव, आमदार सुरेश गोरे उपस्थित होते. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सूर्यकांत महाडिक आणि खासदार अनिल देसाई यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
सय्यद यांच्या प्रवेशानंतर कामगार क्षेत्रातही शिवसेनेची ताकद वाढणार असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वपूर्ण असल्याचे मानले जाते.
इरफान सय्यद यांचे पिंपरी-चिंचवड शहरात कामगारांचे मोठे जाळे आहे. पिंपरी-चिंचवड, चाकण बरोबरच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कामगार क्षेत्रात त्यांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. कामगार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे कार्य आहे. इरफान सय्यद यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.