पिंपरी :- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतून राहुल कलाटे यांनी माघार घेण्याकरिता शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना नेते सचिन अहिर यांनी आज सकाळी कलाटे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल व मोरेश्वर भोंडवे यांनी देखील कलाटे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कलाटे त्यांच्या बंडखोरीवर अद्यापही ठाम राहिले आहेत.
चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घेण्याकरिता अवघा अर्धा तास शिल्लक उरला आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी माघार घेण्याची मुदत आहे. राहुल कलाटे यांनी या निवडणुकीत त्यांची उमेदवारी कायम ठेवल्यास ही लढत तिरंगी होणार आहे. आता अवघ्या अर्धा तासात कलाटे माघार घेणार की लढणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.