पुणे:- जिल्हयातील २०५ – चिंचवड व २१५ कसबापेठ या विधानसभा मतदार संघातील विधानसभा सदस्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी मा.भारत निवडणूक आयोगाने दि. १८ जानेवारी रोजी पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार या दोन विधानसभा मतदार संघामध्ये २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी प्रकिया पार पाडण्यात येणार आहे.
२०५ – चिंचवड व २१५ – कसबापेठ मतदार संघाच्या पोट निवडणूकीच्या संचालनासाठी मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीनुसार २०५ चिंचवड मतदार संघामध्ये एकुण मतदारांची संख्या ५,६८,९५४ इतकी आहे. त्यापैकी ३,०२,९४६ पुरुष, २,६५,९७४ स्त्री व ३४ तृतीय पंथी मतदार आहेत. या एकुण मतदारांमध्ये १२३१३ दिव्यांग मतदार व ८० वर्षावरील ९९२६ मतदार समाविष्ट आहेत. तसेच, ३३१ अनिवासी भारतीय, १६८ सैनिक मतदार या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहेत.
तसेच, २१५ – कसबापेठ मतदार संघामध्ये एकुण मतदारांची संख्या २,७५,६७९ इतकी असून त्यापैकी १,३६,९८४ पुरुष, १,३८,६९० स्त्री व ५ तृतीय पंथी मतदार आहे. या एकुण मतदारांमध्ये ६५७० दिव्यांग मतदार व ८० वर्षावरील १९२४४ मतदार समाविष्ट आहेत. तसेच, ११४ अनिवासी भारतीय, ३८ सैनिक मतदार या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहे.
या मतदान प्रकियेसाठी २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये ५१० व २१५ – कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये २७० मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत. मतदारांना मतदान प्रकियेमध्ये सुलभरित्या सहभागी होता यावे, याकरिता या सर्व मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या किमान मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. २०५ – चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये १३ व २१५ – कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये ९ मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. दोन्ही मतदार संघात एकुण मतदान केंद्राच्या १० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून त्यात या संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.
या निवडणूक प्रकियेच्या संचालनाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगामार्फत दोन सर्वसाधारण निरिक्षक, दोन पोलिस निरिक्षक व दोन खर्च निरिक्षकांची नेमणूक केलेली असून ते सर्व दि. ०६-०२-२०२३ रोजी पुण्यात दाखल झालेले आहे.
दोन्ही मतदार संघात निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेला अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन घेण्यात आलेला असून चिंचवड मतदार संघाकरिता २५५० व कसबापेठ मतदार संघाकरिता १३५० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण दि. १२-०२-२०२३ रोजी घेण्यात आलेले असून दुसरे व तिसरे प्रशिक्षण अनुक्रमे दि. १८ व २५ फेब्रुवारी घेण्यात येणार आहे.
२०५ – चिंचवड मतदार संघामध्ये ४७ व २१५ कसबापेठ मतदार संघामध्ये २५ झोनल अधिकाऱ्यांची तसेच संवेदनशिल मतदान केंद्रासाठी २०५ चिंचवडमध्ये १५ व २१५ कसबापेठ मतदार संघात ११ सुक्ष्म निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सुक्ष्म निरिक्षकांचे पहिले प्रशिक्षण दि. १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे स्तरावर सर्वसाधारण निरिक्षकांचे उपस्थित घेणेत आलेले आहे. व दुसरे प्रशिक्षण दि. २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
पोटनिवडणूकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच, निवडणूक प्रकिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी २०५- चिंचवड मतदार संघाकरिता CRPF, CISF, ITBP च्या प्रत्येकी १ कंपनी RPF च्या २ कंपन्या दाखल झालेल्या आहेत. तसेच, २१५ कसबापेठ मतदार संघाकरिता CAPF च्या ५ कंपन्या दाखल झालेल्या आहेत. तसेच, पुणे शहर पोलिस विभागाकडून २१५ कसबापेठ साठी १५०० पोलिस तर पिंपरी चिंचवड पोलिस विभागाकडून २०५ – चिंचवड मतदार संघासाठी ८३६ पोलिस व १६९ होमगार्ड मार्फत बंदोबस्त पुरविला जाणार आहे.
या पोट निवडणूकीसाठी जिल्हास्तरावर तसेच दोन्ही मतदार संघस्तरावर आचार संहिता कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून चिंचवड मतदार संघात १२ FST, ७ SST, ६ VST व १ VVT Team तसेच, २१५ – कसबापेठ मतदार संघात ९ FST, ९ SST, २ VST व १ VVT Team ची नियुक्ती करण्यात आलेली असून दोन्ही मतदार संघात सदर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
आजअखेर पर्यंत २०५ चिंचवड मतदार संघात ४३ लाख रोकड, ७३३६.१६ लिटर मद्य (किंमत ४,९७,६२५/-) तसेच, ३.५८४ ग्रॅम गांजा ( किंमत ९४७५०/-) जप्त करण्यात आला आहे. तसेच, २१५- कसबापेठ मतदार संघात ५०३५००/- रोकड, ३१३.१८० लिटर मद्य (किंमत २०,६५०/-) तसेच, २५ ग्रॅम एमडी ( किंमत ५ लाख) जप्त करण्यात आला आहे.
भारत निवडणूक आयेगामार्फत निवडणूक प्रकिये दरम्यान उपलब्ध करुन देण्यात आलेल्या CVIGIL सुविधे अंतर्गत चिंचवड मतदार संघात एकुण १० व कसबापेठ मतदार संघात एकुण ५३ तक्रारी प्राप्त झालेल्या असून या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
२०५ चिंचवड मतदारसंघात उमेदवार श्रीमती. अश्विनी जगताप यांना १ पेडन्युज प्रकरणांत नोटीस दिली आहे. तर २१५ कसबापेठ मतदार संघात पेड न्युजची प्रकरणे शून्य आहेत. तसेच, जिल्हास्तरीय एमसीएमसी कमिटी मार्फत २०५ चिंचवड ३० पैकी २७ सी.डी चे प्रमाणिकरण करण्यात आले असून ७ प्रकरणे नामंजूर केली आहेत. तसेच, २१५ कसबापेठ मतदार संघात ३ सीडी चे प्रमाणिकरण करण्यात आलेले आहे.
मतदारांच्या शंकाचे व अडचणींचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तसेच, जिल्हास्तरावरील १९५० या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधून मतदार त्यांच्या शंकाचे निरसन करु शकतात. दोन्ही विधानसभा मतदार संघामध्ये एक खिडकी कक्षांची स्थापना करण्यात आलेली व त्यामार्फत उमेदवारांना पक्ष कार्यालये, वाहन परवाने, प्रचारासाठी रॅली व सभा घेण्यासाठी आवश्यक असलेले विविध परवाने उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी तसेच, ८० वर्षावरील व कोरोना बाधीत रुग्णांना त्यांचा मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा याकरिता Postal Ballot ची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. चिंचवड मतदार संघामध्ये १२३१३ दिव्यांग मतदार व ८० वर्षावरील ९९२६ मतदार तसेच, कसबापेठ मतदार संघामध्ये ६५७० दिव्यांग मतदार व ८० वर्षावरील १९२४४ मतदार समाविष्ट आहेत. या मतदारांना Postal Ballot द्वारे मतदान करता यावे याकरिता फॉर्म क्र. १२ डी चे वाटप करण्यात आले आहे. तसेच, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सुविधा उदा. रॅम्प, व्हीलचेअर्स व मॅग्नीफांईग ग्लास व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही मतदार संघातील सैनिक मतदारांसाठी दि. ११-०२-२०२३ रोजी ETPBS द्वारे मतपत्रिका जनरेट करण्यात आलेली असून सैनिक मतदारांना पाठविण्यात आलेली आहे.
या पोट निवडणूकीमध्ये चिंचवड मतदार संघात २८ व कसबापेठ मतदार संघात १६ व प्रत्येकी १ नोटा अशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या आहे. यामुळे दोन्ही मतदार संघामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर २ BU, १ CU व १ VVPAT ची आवश्यकता आहे. मा. भारत निवडणूक आयोगामार्फत एकुण २४२० BU, १७२० CU व १७२० VVPAT उपलब्ध करुन देण्यात आलेले असून पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची सरमिसळ प्रकिया अनुक्रमे दि. ९ व दि. १३ फेब्रुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निरिक्षकांच्या व उमेदवारांच्या उपस्थित पुर्ण करण्यात आलेली आहे. २०५ चिंचवड मतदार संघाकरिता १४२८ BU, ७१४ CU व ७६५ VVPAT तसेच, २१५ कसबापेठ मतदार संघाकरिता ७५६ BU, ३७८ CU व ४०५ VVPAT वितरित करण्यात आले आहे. तसेच, या EVM – VVPAT ची दुसरी सरमिसळ प्रकिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दि. १४ फेब्रुवारी रोजी पुर्ण करण्यात आली आहे.
मागील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या वेळी २०५ चिंचवड मतदार संघामध्ये ५५.८८ टक्के व २१५ कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये ५१.५४ टक्के मतदान झाले आहे. तरी मतदारांनी या पोट निवडणूकीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा तसेच, निःपक्षपातीपणे व कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक मतदान करावे, यासाठी जिल्हास्तरावरुन व मतदार संघस्तरावरुन स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज अखेर पर्यंत दोन्ही मतदार संघात मिळून ELC, VAF, चुनाव पाठशाळांमार्फत, सांस्कृतिक कार्यक्रम रॅली, पथनाटय, विविध स्पर्धा असे एकुण ४१८ कार्यक्रम घेण्यात आलेले आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. तसेच, दोन्ही मतदार संघस्तरावरुन मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे व मतदार मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे.