चिंचवड – देशातील संविधान आणि लोकशाही संपवण्याचा पध्दतशीर कट संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाने आखला आहे. संविधान वाचवायचे असेल तर भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे अपरिहार्य ठरणार आहे, असे प्रतिपादन ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी केले.
महाविकास आघाडीची भूमिका ही संविधान रक्षणाची असल्याने नाना काटे यांना विजयी करण्याचा निर्धार आंबेडकरवादी, लोकशाहीवादी समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पाठिंबा देण्यात आला. आमदार अण्णा बनसोडे, अजित गव्हाणे, शरद जाधव, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, माजी आमदार प्रकाश गजभीये, संजय अवसरमल, विनोद कांबळे आदींसह सुमारे 500 जण या बैठकीला उपस्थित होते.
अनेक निवृत्त उच्च पदस्थ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा या संघटनेत सक्रिय सहभाग आहे.
भाजपा सरकारला देशाच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर हल्ला करत आहे. त्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानावर हल्ला करून ते नष्ट करण्याचे कारस्थान आखले असल्याचा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. संविधानाने दिलेली लोकशाही धोक्यात आली असून विरोधकांची मुस्कटदाबी सुरु करण्यात आली आहे. या परिस्थितीत संविधान वाचवण्यासाठी पध्दतशीर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत एकमुखाने मांडण्यात आले.
संविधान वाचवण्याची आणि लोकशाही टिकवण्याची महाविकास आघाडीची भूमिका असल्याने महाविकास आघाडीला बळ देणे ही काळाची गरज बनली आहे. संविधान धोक्यात आणण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशातील आंबेडकरवादी आणि संविधानावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी भारतीय जनता पक्षाचा पाडाव करण्यासाठी कटीबध्द राहण्याची प्रतिज्ञा या बैठकीत घेण्यात आली.
भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी सर्वांनी एकत्र येत नाना काटे यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. आपल्या समविचारी व्यक्तींना भेटून त्यांना भाजपाच्या पराभवाची आणि काटे यांच्या विजयाची आवश्यकता पटवून देण्यासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
भाजपाचे राज्य असणाऱ्या राज्यात मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांवरील होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी आणि घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी हा लढा स्वातंत्र्य लढ्याच्या त्वेषानेच लढावा लागेल, असे मत व्यक्त करण्यात आले.