‘महागाईचे अच्छे दिन’ आणणाऱ्यांना घरी बसवा
चिंचवड – शिवसेनेतून बाहेर पडलेले प्रत्येक गद्दार पराभूत झाले आहेत. ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली ते पुन्हा निवडून आले नाहीत. अगदी भुजबळ साहेब यांनाही पराभव पत्करावा लागला तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तर दोनदा जनतेने पाडले आहेत. शिवसेना पक्षाची चिन्हासकट चोरी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन राज्याचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
सांगवी येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, आमदार सुनील शेळके, सुनील टिंगरे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे, योगेश बहल, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, प्रदीप सपकाळ, देवेंद्र तायडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, या भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच निर्माण केला आहे. पवना धरणातून बंद पाईपलाईनमधून पाणी आणण्याचे नियोजन केले, त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे या जनताद्रोही भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची संधी या पोटनिवडणुकीतून जनतेला मिळाली आहे, असे अजित पवार म्हणाले.
विकासकामांवर समोरासमोर चर्चेला या !
राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला विकास सरळ आम्ही केला, असे रेटून खोटे बोलण्याचे पाप भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत. राज्यात काम करताना कायम आपल्या पुणे जिल्ह्याला आणि पिंपरी चिंचवडला झुकते माप दिले. काहींनी या ठिकाणी येऊन केवळ घोषणा केल्या. त्यामुळे ना शास्तीकाराचा प्रश्न सुटला, ना अनधिकृत बांधकामाचा रेड झोनचा प्रश्न सुटला, उलट रावेत परिसरावर नव्याने रेडझोन वाढवला. गेल्या पाच वर्षात त्यांच्या भाजप सरकारने सत्तेवर असताना पालिकेच्या अथवा राज्य सरकारच्या माध्यमातून कोणती विकास कामे केली याची समोरासमोर बसून चर्चा करावी, असे खुले आव्हान अजित पवार यांनी यावेळी दिले.
अच्छे दिन आले का?
2014 मध्ये आमचे यूपीएचे सरकार होते त्यावेळेला पेट्रोलचे दर 71 रुपये होते आज 104 रुपये झाले. अच्छे दिन आले का? डिझेल 56 रुपये होते, आज 93 रुपये झाले अच्छे दिन आले का? सिमेंट 195 रुपये होते, आता 410 रुपये झाले. स्टील 36 हजार रुपये टन होते, आता साठ हजार रुपये टन झाले आहे. रेती दीड हजार रुपये ब्रास होती, आता झाली सहा हजार रुपये ब्रास ..अच्छे दिन आले का? दुचाकी गाडी 50 हजारला मिळत होती, आता 90 हजाराला झाली. गॅस सिलेंडर 350 रुपये होता, आता 1050 रुपये झाला..महिलांना आता कसे वाटते? असे म्हणत कमळाबाईच्या ‘अच्छे दिन’चे वाभाडे अजित पवार यांनी जनतेसमोर काढले.
2017 पासून महापालिकेत भ्रष्टाचाराचा कळस !
1992 ते 2017 काळात प्रशासनाला व स्थानिक नेतृत्वांना हाताशी धरून आम्ही शहराचा सर्वांगीण विकास केला. शहराला पवना धरण, भामा आसखेड आंध्रप्रकल्प यातून कसे पाणी आणले जाईल याचे नियोजन केले. कोणी चुकले तर त्यांना आपल्याला कोणीतरी विचारेल याची भीती होती. मात्र, 2017 पासून महापालिकेत केवळ भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. रेडझोनचा प्रश्न, अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, साडेबारा टक्के परतावा हे सर्व 100 दिवसात प्रश्न निकाली लावू, असे आश्वासन दिले होते. त्याचे आजपर्यंत काय झाले?
आम्ही कधीच उंटावरून शेळ्या हाकल्या नाहीत !
मी शहरात विकास कामे करताना कधीही उंटावरून शेळ्या हाकल्या नाहीत. मेट्रोचा प्रकल्प आघाडीचे सरकार असताना आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर केला. काही शहाणे म्हणतायेत की आम्ही दिल्लीला मेट्रो पाहिली म्हणून आम्ही याठिकाणी मेट्रो आणली, यांना केवळ दुसऱ्यांच्या कामावर रेघोट्या वाढण्याचे काम जमते. त्यांनी जे काही खरे आहे ते सांगावे जे काय बरं वाईट व्हायचं ते इथेच होणार आहे जनतेला मूर्ख बनवू नका असे म्हणत स्थानिक भाजपच्या नेत्यांना अजित पवारांनी चिमटे काढले.
मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या प्रेमात !
मुख्यमंत्री बोलताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे सांगतात. एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन-तीन वेळा ते चुकीचे बोलतात. निवडणूक आयोगाने त्यांचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचे काम केलं म्हणून ते त्यांच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे वारंवार काहीही विचारले की त्यांच्या तोंडात निवडणूक आयोग, निवडणूक आयोग हेच नाव येते. जे पोटात आहे ते ओटात येतेय संपूर्ण जनतेने पाहिले आहे. प्रबोधनकर ठाकरे यांनी मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी शिवसेना काढली. ज्यांनी शिवसेना काढली त्यांच्या मुलापासून व नातवापासून शिवसेना नाव व चिन्ह घेता ? जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा घणाघात अजित पवारांनी केला.
शहराचा नावलौकिक परत मिळवणार – नाना काटे
उमेदवार नाना काटे म्हणाले, भाजपने गुजरातचा विकास करून देशाची सत्ता हस्तगत केली. मी तर याच विधानसभेत पिंपळे सौदागर विकासाचे मॉडेल उभारले आहे हे मायबाप जनतेला माहीत आहे. तोच विकास चिंचवड विधानसभा मतदारसंघात करण्यासाठी मी आपले नेते अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू ठेवणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जाती पातीचे विष पेरणाऱ्या प्रवृत्तीविरोधात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु असणाऱ्या लढ्यात मी जातीने उतरलो आहे. पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, शिक्षण क्षेत्र, सोसायट्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटीबध्द आहे. मला आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करावे. सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून आपल्या उद्योगनगरीचा नावलौकीक परत मिळवू, असे काटे यांनी सांगितले.