चिंचवड :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला आहे. या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत पहायला मिळाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ५०.४७ टक्के मतदान झाले आहे. सहा वाजता मतदान केंद्राचे दरवाजे बंद करण्यात आले.
चिंचवड विधानसभा मतदार संघात आज रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५०.४७ टक्के मतदानाची नोंद झाली असल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत येथे ५६.३० टक्के मतदान झाले होते. तर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५३.५९ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे आज झालेल्या पोटनिवडणुकीत केवळ ५०.४७ टक्के मतदान झाल्यामुळे कोणाला फटका बसतोय? आणि कोणाला फायदा होतोय हे दि.०२ मार्च रोजीच मतमोजणी झाल्यावर स्पष्ट होणार आहे.
- आज दिवसभरातील मतदानाची अपडेटस्..
- सकाळी ०९ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदान
- सकाळी ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के मतदान
- दुपारी ०१ वाजेपर्यंत २०.६८ टक्के मतदान
- दुपारी ०३ वाजेपर्यंत ३३.५५ टक्के मतदान
- सायंकाळी ०५ वाजेपर्यंत ४१.०६ टक्के मतदान
- सायंकाळी ०६ वाजेपर्यंत ५०.४७ टक्के मतदान
चिंचवड मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदानाकरिता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. यासाठी एकूण ३७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली होती.