पिंपरी: उद्योजक आणि स्टार्टअप उपक्रमांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आणि आर. फ्रिक्शन एंटरटेनमेंट/ स्लेजेंड्स व्हेंचर्स प्रा.लि यांच्यात दोन वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. ऑटो क्लस्टर येथे स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, ऑटो क्लस्टरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य यांनी पीसीएसआयसीकडून तर आर. फ्रिक्शन एंटरटेनमेंट/ स्लेजेंड्स व्हेंचर्स प्रा.लि. मार्फत कंपनीच्या संचालिका श्रीमती शर्वरी गवांदे यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या. यावेळी, व्यवस्थापक उदय देव, लेखापाल आदित्य मासरे यांच्यासह स्टार्टअप्स उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी व ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीएससी कार्यक्षेत्रात ऑटो क्लस्टर येथे स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर उभारण्यात आले आहे. ऑटोमोटीव्ह इंजिनिअरींग, बायोफार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये नवनिर्मिती, सहयोग आणि उद्योजकता आदी क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी इनक्युबेशन सेंटरचे कामकाज सूरू आहे. इन्क्युबेशन सेंटरकडे आता १२ मार्गदर्शकांची टीम असून सध्या एकूण ३० स्टार्टअप सक्रियपणे कार्यरत आहेत.
इनक्यूबेट्स तसेच स्टार्टअप्समध्ये आवश्यक ज्ञानासह पिंपरी चिंचवड आणि पुणे क्षेत्रात विविध सत्रे घेण्यात आली आहेत. तसेच, नवनिर्मीतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आमंत्रित करून स्टार्टअपला सादरीकरणाची संधी देण्यात येते. आर. फ्रिक्शन एंटरटेनमेंट/ स्लेजेंड्स व्हेंचर्स प्रा.लि. कंपनीचा इनक्युबेटरला देखील याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी यावेळी व्यक्त् केले.
भारतातील उद्योजकता आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर उभारण्यात आले आहे. विज्ञान, अभियांत्रिकी, कला, कृषी तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक नवोपक्रम (आरोग्य, शिक्षण) इत्यादी विविध शाखांमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह नवीन उपक्रमांच्या उष्मायनाची सुविधा निर्माण करून त्यांना भौतिक, तांत्रिक, आर्थिक, नेटवर्किंग समर्थन आणि सुविधा अशा प्रकारे नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, असे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ऑटो क्लस्टरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य यांनी सांगितले. प्रसंगी, विविध स्टार्टअपवर चर्चा करण्यात आली.