पिंपरी : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प सर्व समाज घटकांना उन्नतीकडे नेणारा आहे. थेट जनतेचा सहभाग असलेला अर्थसंकल्प त्यांनी मांडला आहे. “दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात”, असे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात म्हटल्याप्रमाणे समाजातील सर्व घटकांना जे जे हवे ते ते या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी दिली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत शंकर जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आज तुकाराम बीज सोहळा. आजच्याच दिवशी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. “दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात”, असे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात म्हटल्याप्रमाणे समाजातील सर्व घटकांना जे जे हवे ते ते या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यांनी या अर्थसंकल्पासाठी थेट जनतेकडूनच सूचना मागवल्या होत्या. जनतेने केलेल्या सूचनांचा समावेश करून राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता भागिदार असलेला अर्थसंकल्प त्यांनी मांडला आहे.
राज्यातील सर्व घटकांना प्रगतीकडे नेणारा, सर्वसमावेशक विकासावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. विकासाची फळे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतील असा समृद्ध आणि सर्वसमावेशक महाराष्ट्राची कल्पना अर्थसंकल्पात आहे. शेतकरी, महिला, आदिवासी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, वारकरी, असंघटित कामगार, रुग्ण, इतर मागासवर्गीय, गुंतवणूक, रोजगार, पर्यावरणपूरक विकास, शहरांचा सर्वांगिण विकास, गडकिल्ले तसेच पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद आणि सर्वसमावेशक नव्या योजना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात त्यांनी केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करून त्याअंतर्गत राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना दरवर्षी केंद्राच्या योजनेतील निधीसह १२ हजार रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ १ रुपयांत पीकविमा दिला जाणार आहे. भाजप-शिवसेना महायुती सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे.
महिलांचा आर्थिक विकास साधण्यासाठी एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, महिला खरेदीदारांना मुद्रांक खरेदीत एक टक्का सवलत, महिलांचे मासिक २५ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त, अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३०० रूपयांवरुन १० हजार, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७ हजार २०० रूपये, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४ हजार ४२५ वरून ५ हजार ५०० रूपये करण्याची घोषणा केली आहे. पीडित महिलांसाठी शक्तीसदन योजना सुरू करून आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन केले जाणार आहे.
राज्यातील गरीब मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता चौथीत ४ हजार रुपये, सहावीत ६ हजार रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थी मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र सुरू केले जाणार आहे. राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गोरगरीब रुग्णांवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा ४ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. संपूर्ण राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे ७०० आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याच्या सन्मानासाठी श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. शिक्षकांच्या आधीच्या मानधनात दहा हजारांची वाढ, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये चारपट वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील करोडो मराठी जनांचे जीवन सहज करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.”