पिंपरी :- शासकीय राजवटीतील पिंपरी चिंचवड शहर मागील पाच वर्षे कारभार पाहणारे सत्ताधारी भाजपमुळे अधोगतिकडे गेले असल्याचे आज महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (दि. 14) सादर केलेले अंदाजपत्रकातून दिसून येत आहे. शहरासाठी नविन अथवा ठोस प्रकल्प असा एकही तरतूद यामध्ये दिसून येत नाही. केवळ पाच वर्षांपासून रखडलेले प्रकल्पावर मलमपट्टी करणारे अंदाजपत्रक आहे अशी टिका राष्ट्रवादीचे नेते माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
महापालिकेचे ४४ वे व प्रशासकीय राजवटीतील पहिले अंदाजपत्रक शेखर सिंह यांनी आज सादर केले. यामध्ये पूर्वीच तयार केलेले मासुळकर कॉलनीतील डोळ्यांचे रुग्णालय, वर्षानुवर्ष खर्च करणारा नदीसुधार प्रकल्प, तालेरा रुग्णालय, पीपीपी तत्वावर कॅन्सर हॉस्पीटल, केवळ ठेकेदार जोपासण्यासाठी वेस्ट टू एनर्जी वरती तरतूद, नव्याने महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, बायोगॅस प्रकल्प चालू वर्षात सुरू होतील, असे वार्षिक अंदाजपत्रकात म्हटले आहे.
जे सर्व प्रकल्प मागील सत्ताधारी भाजपच्या काळात मान्यता देऊन वर्कऑर्डरही काढण्यात आल्या आहेत. तेच जुने प्रकल्प नव्याने दाखवून काहीतरी नवीन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. केवळ पाच वर्षांपासून रखडलेल्या कामावरतीच काम करत असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधोरेखीत केले आहे. विरोधकाकडून जे प्रकल्प सुरू केल्याचा कांगावा केला जातो तेच प्रशासकीय राजवट करत आहे कारण ते अद्याप अपूर्णच आहेत याची प्रशासकांनी स्पष्ट कबुल दिल्याचे यातून दिसते.
त्याचबरोबर एकेकाळी सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणारे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका मागील पाच वर्षाच्या चुकीच्या कारभारामुळे दिवाळखोरी कडे निघालेली आहे. कारण चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात उत्पन्नही घटल्याचे दिसून येते. मागील वर्षी उत्पन्नाचा अंदाज आणि यंदाच्या उत्पन्नाच्या अंदाजात यात तीनशे कोटींहून अधिक रक्कमेची कमतरता स्पष्ट दिसते याचा थेट परिणाम शहरातील विकासावरती होणार आहे. केवळ जुन्याच योजनांना मुलामा देऊन नव्याने अंदाजपत्रक सादर करून शहरवासीयांच्या पदरी निराशा येणारा हा अर्थसंकल्प आहे असे नाना काटे यांनी केली आहे.