पिंपरी :- महाराष्ट्राची लोककला लावणी पुनर्जीवित करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच येत्या २५ आणि २६ तारखेला महालावणी स्पर्धा होणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राची लावणी परंपरा जपणाऱ्या कलाकारांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येईल, अशी माहिती कार्यक्रमाच्या आयोजक आमदार उमा खापरे आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी दिली आहे.
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, संजय मंगोळेकर आदी या वेळी उपस्थित होते. २५ तारखेला सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत स्पर्धा होणार आहे. त्यासाठी महिलांनाच विनाशुल्क प्रवेश असणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते होईल.
२६ तारखेला सायं. ६ वाजता सवाल जवाब कार्यक्रम आणि अंतिम फेरी होणार आहे. परीक्षक सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.