आ. गोटेंनी वाचला दरेवार यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा
महापालिकेचे तत्कालीन अभियंता श्री दरेवार यांनी केलेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचा पाढा आ. अनिल अण्णा गोटे यांनी वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांसमोर वाचून दाखविला. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बदली केल्यानंतर हा एक वर्ष कामावर हजरच झाला नाही. ना. बबनराव लोणीकर यांनी नाशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना येत्या आठवडाभराच्या आत श्री दरेवारवर चार्जशीट तयार करून एफ.आय.आर. दाखल करण्याचे आदेश पारीत केले. महापालिकेने त्यांच्याकडे प्रलंबीत असलेली सर्व कागदपत्रे व तांत्रिक माहिती येत्या महिन्याभरात जीवन प्राधिकरणाकडे सोपवावी, असे आदेशही मंत्र्यांनी दिल्याची माहिती आ. अनिल गोटे यांनी दिली.
धुळे : धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी 136 कोटी रूपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम पुनश्च सुरू होऊन वेळेत पुर्ण व्हावे यासाठी नागपुर येथे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विशेष बैठक घेतली. 16 डिसेंबर 2017 रोजी ठेकेदाराच्या कामाची मुदत संपुष्टात येणार आहे.
जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता व जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यानी कुठल्याही परिस्थितीत 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत या योजनेचे काम पुर्ण करू, अशी ग्वाही मत्र्यांना दिली. बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य तांत्रिक सल्लागार श्री लांडगे, महापालिकेतर्फे उपायुक्त श्री जाधव, कैलास शिंदे उपस्थित होते. अशी माहिती आ. अनिल गोटे यांनी दिली.
136 कोटी रूपयाची पाणीपुरवठा योजना महापालिकेकडून जीवन प्राधिकरणकडे वर्ग केल्यानंतर गेल्या 9 महिन्यात काय कामे झाली ? कुठली कामे शिल्लक राहिलीत? याचा आढावा मंत्र्यांनी घेतला. गेल्या 9 महिन्यात 50 कि.मी.लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली. 7 पैकी 2 जलकुंभाचे काम स्लॅब लेव्हलपर्यंत आले आहे.
तिसऱ्या जलकुंभाचे काम प्रगतीपथावर आहे. 2 जलकुंभाच्या जागा राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे तीन-चार वेळा जागा बदलाव्या लागल्या. अखेरीस तीनच दिवसापूर्वी यातून मार्ग निघाला असून येत्या आठवडाभरात या दोन्ही जलकुंभाचे काम सुरू होईल. उर्वरीत 2 जलकुंभाचा उल्लेखच मूळ 136 कोटी रूपयाच्या टेंडरमध्ये नव्हता.
जीवन प्राधिकरणाकडे सदर योजना सुपूर्द केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. आता येत्या आठवडाभरामध्ये या 2 जलकुंभांच्या कामाची स्वतंत्र्य निविदा काढून नंतर ठेकेदार निश्चित करता येईल. मूळ टेंडरमध्ये 7 जलकुंभाचा उल्लेख असणे आवश्यक होते. पण पाचच जलकुंभाचे उल्लेख असल्यामुळे हे काम पुन्हा नव्याने करावे लागणार आहे.
ठेकेदाराने टाकलेली पाईपलाईन कुठे व कशी टाकली आहे याचे नकाशे महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. यामुळे पुढील काम करणे अडचणीचे झाले आहे. या संबंधात ठेकेदार, तांत्रिक सल्लागार, जीवन प्राधिकरण, महापालिका यांची एकत्रीत बैठक होवून नंतरच पुढील कामास सुरवात करता येईल.
तांत्रिक सल्लागाराने पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा आराखडा तयार केला. त्या सल्लागाराने जलकुंभासाठी उपलब्ध नसलेल्या जागेवर जलकुंभ दर्शवून योजनेचे नकाशे व आखणी केल्याचे सत्य समोर आले.
मूळ नकाशात दर्शविण्यात आलेल्या परंतु जागा अस्तित्वात नसलेल्या नव्याने उभारावयाच्या जलकुंभाचे अंतर जलकुंभाच्या दर्शविलेल्या नियोजीत जागेपासून सुमारे एक ते दीड कि.मी. दूर असल्यामुळे संबंध पाईपलाईनच्या डिझाइनची पुनश्च आखणी करावी लागेल.