होर्डिंग कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना महापालिकेने ५ लाख रुपयांची मदत द्यावी
पिंपरी :- देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावरील किवळे येथिल जाहिरात फलक कोसळून पाच मजूर मृत्युमुखी पडले आहेत व ३ मजुर गंभीर जखमी आहेत. मृत व्यक्तींबाबत आमदार बनसोडे यांनी शोक व्यक्त केला असून मृत व्यक्तींच्या वारसांना पाच लाख रुपये व जखमींना दोन लाख रुपये मदत महापालिकेने द्यावी, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडे केली आहे.
जाहिरात फलक कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली असून निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. यास सर्वस्वी मनपा जबाबदार असून बेकायदा, दोन मजली तसेच निर्कुष्ट दर्जाचे साहित्य वापरून उभे केलेले जाहिरात फलक हे मनपा आकाशचिन्ह विभागातील खाबुगिरीचे दर्शन आहे. शहरातील सर्व जाहिरात फलकांचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट मनपाने करून घ्यावे व जबाबदारी निश्चित करावी दुमजली व मोठ्या साईजचे जाहिरात फलकांवर तात्काळ कारवाई करून टाकावेत, जोपर्यंत अनधिकृत, दुमजली व मोठ्या साईजचे फलक व सांगाडे काढले जात नाहीत तोपर्यंत या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची जबाबदारी मनपाने घ्यावी व अशा अपघात ग्रस्त नागरिकांना व त्यांच्या वारसांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.
एकूणच मनपाच्या आकाशचिन्ह विभागातील अनागोंदीकारभार चव्हाट्यावर आला असून निष्पाप नागरिकांचे बळी जाण्यास याच विभागातील अधिकाऱ्यांची मानसिकता जबाबदार असून प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्तांनी जबाबदारी स्वीकारावी व या मृत व्यक्तींच्या वारसांना व जखमी व्यक्तींना आर्थिक मदत करावी हि आमदार बनसोडेंची मागणी असून आता मनपा प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेईल हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.