पिंपरी :- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर) निर्मितीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. अभियांत्रिकीच्या चारही विभागांचे नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशन (एन.बी.ए.) मानांकन पीसीसीओईआर ने पहिल्या फेरीत पटकावले होते. आता या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक बहु मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’चे परीक्षण महाविद्यालयाने यशस्वीरीत्या पूर्ण केले असून ए++ ही सर्वोच्च श्रेणी पुढील पाच वर्षांसाठी परीक्षणाच्या पहिल्याच फेरीत प्राप्त करून नवा विक्रम नोंदवला आहे.
पीसीसीओईआर मध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक व कला-क्रीडा-साहित्य क्षेत्रातील प्रगती, त्यांसाठी पुरविल्या गेलेल्या आवश्यक सोयी-सुविधा-संधी, विद्यार्थ्यांच्या पदव्योत्तर व्यावसायिक वाटचालीसाठी महाविद्यालयाचे योगदान, तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, वर्तन आणि वृत्ती अशा गुणविशेषांवर महाविद्यालयाने घेतेलेले परिश्रम, याची सखोल शहानिशा ‘नॅक’च्या शिक्षणतज्ज्ञ परीक्षकांनी केली. पीसीसीओईआरने या सर्व कसोट्या पूर्ण करून हे अत्युच्च मानांकन पटकावले आहे. पीसीसीओईआर महाविद्यालयाचे स्थान पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी प्रवेश प्राधान्यात नेहमीच पहिल्या दहा महाविद्यालयांत तर अभियांत्रिकीच्या निकालात पहिल्या पाच क्रमांकाने आहे. पीसीइटीच्या मध्यवर्ती प्रशिक्षण व नियुक्ती (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट) कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या कठोर नियुक्ती प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात. बौद्धिक संपत्ती हक्क (आयपीआर) यामधील अनेक जागतिक उच्चांक व सिप्सीज या राष्ट्रीय परिषदेसाठीही पीसीसीओईआर चर्चेत असते. आता राष्ट्रीय पातळीवरील बहुमुल्य सन्मान प्राप्त करून पीसीसीओईआरने देशातील एक अग्रगण्य शिक्षणसंस्था म्हणून लौकिक मिळवला आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी पीसीसीओईआर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, रजिस्ट्रार प्रकाश येवले आणि ‘नॅक’चे समन्वयक डॉ. संतोष रणदिवे व डॉ. समीर सावरकर यांचे अभिनंदन करून स्थापनेनंतर केवळ आठच वर्षांत आणि परीक्षणाच्या पहिल्याच फेरीत ए++ हे मानांकन मिळवणे ही खरोखरच स्तुत्य केली आहे. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, माजी मंत्री व विश्वस्त हर्षवर्धन पाटील व कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच शैक्षणिक संस्था समाजास उत्तम विद्यार्जन करण्यास व उत्तमोत्तम सेवाव्रती व्यावसायिक घडविण्यास कटीबद्ध आहे.
पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी सांगितले कि, सुरुवातीपासूनच महाविद्यालयाची वाटचाल शैक्षणिक प्राविण्य, संशोधन व नवनिर्माण, व्यवसायाभिमुखता आणि सामाजिक बांधिलकी या चतु:सुत्रीवर चालली असून विद्यार्थ्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा सांस्कृतिक आदी सर्वांगीण विकासावर महाविद्यालय भर देत असल्याने ‘नॅक’च्या परीक्षणास आम्ही आत्मविश्वासाने सामोरे गेलो. विश्वस्तांचे मार्गदर्शन आणि अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे सांघिक योगदान यामुळे हे मानांकन आम्हास प्राप्त झाले.