धुळे : येथील इंडीयन चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रणजीत राजे भोसले व शहरातील काही तरुण कार्यकर्त्यांनी एका अभिनव उपक्रमाने नववर्षाचे स्वागत केले. या उपक्रमांतर्गत नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील पुतळे व स्मारकांची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आजकालचे तरुण पार्टी करतात. फिरायला जाऊन मौजमजा करतात. परंतु, आज शहरातील काही ध्येयवेड्या तरुणांनी चांगला पायंडा पाडला आहे. नवीन वर्षाचे स्वागत मद्यप्राशन करुन मौजमजा न करता सामाजिक भान ठेवून नवीन वर्षात थोर महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा निश्चय त्यांनी केला. यानिमित्ताने त्यांनी थोर महापुरुषांची प्रेरणा घेऊन वाटचाल करावी, असा
संदेश दिला आहे.
या उपक्रमात विशाल पाटील, अमोल पाटील, संदीप पाकळे, राकेश पाटील, नितीन कोटेचा, प्रफुल्ल पवार, सागर पवार, दादा पाटील, सागर बोरसे, बंटी चव्हाण, सुशील विधाते आदी तरुण सहभागी झाले होते. दरम्यान, यापूर्वी ट्रस्टचे अध्यक्ष रणजीत भोसले व तरुणांनी शहरामध्ये माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरु केला होता.























