चौफेर न्यूज : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्रीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी, बालगोपालांनी दहिहंडीचे थर करून दहिहंडी फोडण्याचा आनंद घेतला. याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील, प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, वैष्णवी देवरे यांनी बाल श्रीकृष्णाचे पूजन केले. प्रसंगी शाळेच्या शिक्षिका हिरल सोनवणे, सुनीता पाटील यांनी श्रीकृष्णाची महंती विशद केली. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे, असे त्यांनी सांगितले.
भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक रासलीला व कृष्ण लीला यावर आधारित एक छोटीशी नाटिका सादर करण्यात आली. हरिता अहिरराव, हार्दिक माळीजकर, भार्गवी ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीबद्दल माहिती देताना सांगितले की, हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी श्रीकृष्ण चा जन्म मथुरेत मध्यरात्री झाला. कृष्णाचा जन्म अराजकतेच्या प्रदेशात झाला. छळाचे प्रमाण वाढले होते. लोकांचे स्वातंत्र्य नाकारण्यात आले होते. सर्वत्र वाईट गोष्टी घडत होत्या. म्हणूनच श्रीकृष्णाने कंस मामाचा वध केला. श्रीकृष्ण अष्टमीला रात्री लोक जागरण करून भक्ती गीते गातात, उपवास करतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी, श्रीकृष्णाचे पाळणा गीत व श्रीकृष्ण जीवन लींलावर आधारित नाटिका चौथीच्या व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. राधा कैसे न जले, ये किसना है… या गाण्यावर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य प्रदर्शन केले. गीतांजली काकुस्ते, कोमल बागले यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. राजपूत सरांनी श्रीकृष्ण लीला विषयी व गोपालकाला विषयी माहिती दिली. गोपालकाला उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादास गोपालकाला म्हणतात. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला… असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात, दहीहंडी फोडतात. इयत्ता नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. अखेरीस इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. त्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी गोपाल काल्याचा प्रसादाचा आस्वाद लुटला. शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व रांगोळीचे रेखाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन वैष्णवी देवरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.