चौफेर न्यूज : गोविंदा आला रे आला च्या जयघोषात प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सव मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला. इयत्ता तीसरी, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य आणि गरबा सादर करून उत्सवाचा आनंद द्विगुणीत केला. नर्सरी ते सातवी पर्यंतच्या बालगोपाळांनी दही हंडीसाठी थर लावून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.
याप्रसंगी शाळेचे संस्थापक प्रशांत भिमराव पाटील, श्रीयुत सुपेकर, शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील, समन्वयक राहूल अहिरे यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आकर्षक फलक लेखन करण्यात आले. तसेच सुंदर अशी रांगोळी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता अहिरे यांनी केले. रिनल सोनवणे यांनी श्रीकृष्ण जन्म कथा सांगितली. तसेच, अश्विनी पगार, माधुरी शिंदे यांनी अच्युतम केशवम् हे गीत सादर करून सर्वाना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.
बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. दहीहंडीच्यावेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात. आजमितीला प्रत्येक विभागात विविध मंडळे या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी (छोट्या आकाराचे मडके) लावले जाते. ही हंडी तरुणांची विविध मंडळे फोडण्याचा प्रयत्न करतात. जन्माष्टमी जशी जवळ येते तसे तरूण दहीहंडी फोडण्याचा सराव करतात. हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्यात बक्षिसही दिले जाते.