दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव : नादब्रह्म परिवारातर्फे आयोजन
पिंपरी : नादब्रह्म परिवाराच्या वतीने दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवाच्या 22 व्या वर्षातील कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. दीनानाथ मंगेशकरांनी स्थापन केलेल्या ‘बलंवत संगीत मंडळी’ चे शताब्दी वर्ष व हृदयनाथ मंगेशकर यांचे सहस्त्रचंद्र असे दोन्हीचे योग साधत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी करवीर पीठाचे जगद्गुरू विद्यानृसिंह भारती, शारदापीठाचे संस्थापक व संस्कृत पंडित वसंत गाडगीळ, घनपाठी वेदमूर्ती दि. मा. फडके, पं. हृदयनाथ मंगेशकर या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी संस्थेचे मुख्य विश्वस्त डॉ. रवींद्र घांगुर्डे, अध्यक्षा डॉ. वंदना घांगुर्डे, सचिव अरुण चितळे आदी उपस्थित होते. यावेळी पं. वसंत गाडगीळ यांनी मानपत्राचे वाचन केल्यानंतर प. हृदयनाथ यांच्या हस्ते नादब्रह्म परिवाराच्या ‘नाद अनाहत’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
पं. हृदयनाथ यांनी स्वतःच्या सांगितिक प्रवासातील अनुभव श्रोत्यांसमोर मांडले. तसेच नादब्रह्म परिवाराचे सांगितिक कार्य व दीनानाथ यांची गायकी समाजापुढे पुन्हा मांडण्याच्या धडपडीचे कौतुक केले. यावेळी जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते प. हृदयनाथ यांना ‘नादस्वर ब्रह्मर्षी’ ही पदवी देण्यात आली.
यानंतर जगद्गुरु शंकराचार्य यांचे बोधप्रद आशीर्वचन झाले. त्यानंतर अनाहत पुणे निर्मित सावनी रवींद्र प्रस्तुत ‘स्वर हृदयांतरी’ हा पंडितजींच्या रचनांचा सुरेल कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध कलाकार प्रमोद पवार व दीप्ती भागवत यांनी केले, कार्यक्रमाचे संगीत नियोजन विवेक परांजपे यांनी केले. यामध्ये प्रसन्न वाघ (हार्मोनियम), अमृता ठाकूर- देसाई (सिंथेसायजर), नितिन शिंदे (तबला), प्रशांत साळवी (कोरस), अजय अत्रे (ऑक्टोपॅड), आदित्य आपटे (साईड रिदम) अशी साथ दिली. तसेच ध्वनी संयोजन निलेश यादव यांनी केले. महोत्सवासाठी विनिता रायकर, नेहा कुलकर्णी, शाल्मली कुलकर्णी, स्नेहल कोकीळ, वृषाली भणगे, मानस रायकर, दामिनी वाघमारे यांनी संयोजन केले.