पिंपरी : “महाराष्ट्रामध्ये सध्या दोन कोटी पेक्षा अधिक वाहने आहेत. फक्त पिंपरी-चिंचवडमध्येच गत वर्षात एक लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर एक लाख वाहनांची भर पडली आहे. एका वर्षात नोंदणी होणाऱ्या या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत जुन्या गाड्या नागरिक कमी करत नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी जुन्या गाड्यांचा मोह सोडणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शिक्षकांसाठी “रस्ता सुरक्षा” कार्यशाळा झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे, उपसभापती विष्णू नेवाळे, शिक्षण मंडळाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक चंद्रकांत माने, शिक्षण मंडळाचे सदस्य विजय लोखंडे, नाना शिवले, शिरीष जाधव आदी उपस्थित होते. तसेच महापालिकेतील प्रत्येक प्रत्येक शाळेतील एका शिक्षक उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले की, “नवीन वाहने आणि जुनी वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे जुनी वाहने नागरिकांनी वापरली नाही पाहिजे. केवळ एकाच वर्षात नोंद झालेल्या वाहने एका-मागे एक लावली तर पुर्ण पुण्याला वेढा बसेल ऐवढी त्यांची लांबी आहे. त्याचबरोबर मुलगा किंवा मुलगी परिक्षा उत्तीर्ण झाली की, पालक आनंदाने लगेच गाडी खरेदी करून देतात. मुलाने बुलेट मागितली तर त्याला लगेच बुलेट हजर असते. पिंपरी-चिंचवड भाग सधन असल्याने नागरिक मुलांच्या अपेक्षा लगेच पुर्ण करतात. मुलांना गाड्या घेऊन देताना त्यांना वाहतूकीचे नियम मात्र शिकवत नाहीत. मुले वेगाने वाहने चालवतात हे चुकीचे आहे. त्यामुळे वेगाची नशा घातक आहे”. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. तर, विष्णु नेवाळे यांनी आभार मानले.