प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये दि. १४ व १५ डिसेंबर रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा मोठया उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ए. पी. गांगुर्डे होते. शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक यावेळी उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत करून सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राहुल पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. ए. पी. गांगुर्डे यांनी दैनंदिन जीवनात खेळांचे काय महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. शारीरिक शिक्षण हा शिक्षण पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. जीवनात आरोग्य आणि चैतन्य मिळवण्यासाठी खेळ देखील खेळले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. राहुल पाटील यांनी देखील खेळाचे महत्व पटवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी खेळाचे फायदे सांगितले. अर्चना देसले यांनी खेळाचे नियम सगळ्यांना बंधनकारक असावे, यासाठी खेळाची शपथविधी दिली.
इयत्ता ३ री, ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांनी मार्च- पास्टची सलामी दिली. क्रिडा स्पर्धेच्या समारंभाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रिडा मशाल प्रज्वलित करण्यात आली. तसेच इयत्ता 5 वी, 6 वी आणि ७ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध पिरॅमीडचे प्रदर्शन केले. इयत्ता ४ थी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे डम्बेल नृत्य सादर केले. एल.के.जी व नर्सरीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सुंदर नृत्य सादरीकरणातून रंगत आणली. हिरवा झेंडा दाखवून क्रीडा स्पर्धेची सूरूवात करण्यात आली. धावणे या खेळाचे उद्घाटन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत, विद्यार्थ्यांनी वेगवेगळया क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविले. तसेच, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्रिडाप्रकार घेण्यात आले. यामध्ये, “धावणे, वन लेग रेस, म्युझिकल चेअर, बनाना रेस, बलुन गेम, रिंग पोटॅटो रेस, बुक बॅलेंस रेस, निडल ॲण्ड थ्रेड, लाँग रेस, स्किपिंग, रिले रेस, थ्री लेग रेस, ब्लो द बलुन, कलेक्ट बॉल विथ नीज, बॉल पिकअप ड्रॉप रेस, फिल द बॉटल विथ वॉटर, ब्रेक बलुन” इत्यादी क्रिडा प्रकार घेण्यात आले. सुत्रसंचालन “सुनिता जाधव तर आभार प्रदर्शन अर्चना देसले यांनी मानले. सुंदर फलक लेखन आणि सुरेख रांगोळीने स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.