साक्री : अयोध्येत 22 जानेवारी या ऐतिहासिक दिवशी श्रीराम प्रभूंच्या अयोध्येतील नवनिर्मित मंदिरामध्ये श्री राम – प्रभूंची नूतन मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा निमीत्त प्रचिती स्कूलमध्ये श्री राम रक्षा स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, संयोजक वैष्णवी देवरे, गीतांजली काकुस्ते यांच्या हस्ते श्रीराम (तनिष्क ठाकरे), सीता (आरोही देसले), लक्ष्मण( स्वराज कांकरिया), हनुमान (आरव देसले), शबरी (तेजस्विनी खैरनार) तसेच श्रीराम (अनुराग देशपांडे- पहिली), सीता (महेश्वरी ठाकरे- एलकेजी), लक्ष्मण (पार्थ सोनवणे -एलकेजी) यांचे पूजन करण्यात आले.
प्रसंगी श्रीराम जीवनशैलीवर आधारित “श्रीराम आये है” या गाण्यावर आधारित नृत्य इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यासाठी रोहिणी सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याचे सादरीकरण केले. हा कार्यक्रम गीतांजली काकुस्ते यांच्या मार्गदर्शनात पार पडला. तसेच, शाळेमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना बसवून जय श्रीराम नाव तयार करण्याचे मार्गदर्शन तुषार सूर्यवंशी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन भूपेंद्र साळुंखे आणि सुंदर रांगोळीचे रेखाटन, श्रीराम प्रभुंच्या रॅलीचे डेकोरेशन दीपमाला मॅडम, जागृती मॅम, सविता लाडे, वैष्णवी थोरात यांनी केले. याप्रसंगी श्रीराम प्रभूंची पालखी रॅली साक्री येथील श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली. याप्रसंगी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम नामाचा जयघोष केला. विद्यार्थ्यांनी भजन कीर्तन करत रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला.
वैशाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम प्रभूंच्या अयोध्येतील मंदिर पारंपारिक नागरशैलीत बांधले आहे. मंदिराची पूर्व पश्चिम लांबी 380 फूट व रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट असून मंदिर तीन मजली उभारण्यात आले आहे. प्रत्येक मजला वीस फूट उंच आहे. मंदिराला 392 खांब 44 दरवाजे, भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालमूर्ती स्थित आहे. प्रथमतः गर्भगृह श्री राम दरबार आहे. नृत्य मंडप, रंगमंडप, सभामंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप आहेत. खांबावर तसेच भिंतीवर विविध देवी देवतांच्या तसेच देवांगनांच्या मूर्ती आहे. मंदिरात 32 पायऱ्या चढून पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होवून मंदिराच्या चहू बाजूला आयताकृती प्राकार आहे. त्याची लांबी 732 मीटर आणि रुंदी 425 मीटर आहे. प्राकाराच्या चारही कोपऱ्यांमध्ये चार मंदिरे आहेत. भगवान सूर्य, भगवान शंकर ,श्री गणेश, देवी भगवती तसेच दक्षिण बाजूस श्री हनुमान आणि उत्तर बाजूस अन्नपूर्णा देवीचे मंदिर असून मंदिराजवळ पौराणिक काळातील सीता कूप आहे. श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्ती, निषादराज गुह, माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. मनीषा बोरसे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानिमित्त शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग व वाहन चालक वर्ग यांचे सहकार्य लाभले.