प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम
पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी भिला मन्साराम खैरनार (निवृत्त सैन्य अधिकारी, पदवी नायक), समन्वयक राहुल अहिरे, प्राचार्या अनिता पाटील, शाळेचे शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पथ संचालनाने झाली. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा देऊन वातावरण प्रफुलित केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. यावेळी, कवायत साठी बँड पथकाने योग्य साथ दिली. इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी माहेश्वरी, इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आर्यन अहिरराव यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
विद्यार्थ्यांनी भारतमाता तसेच विविध राष्ट्र पुरुषांच्या वेशभूषा साकारून कार्यक्रमात रंगत आणली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांनी मनोगतातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद केले. तसेच शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील, काजल राजपूत यांनी संविधान आणि लोकतंत्र याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्किट व लाडू शाळेतर्फे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वाघ यांनी केले. कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी, फलक लेखन व मैदानाची सुंदर आखणी करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.