पिंपरी (दि. 15 जानेवारी 2017) वेगाने बदलणा-या जागतिक आर्थिक घडामोडींमध्ये भारताला टिकून रहायचे असेल तर सर्वसमावेशक उत्कृष्ट आर्थिक धोरणे राबविली पाहिजेत. तसेच प्रत्येक क्षेत्रातील उत्पादकता वाढीस चालना देऊन उत्पादन साधनांचा पर्याप्त वापर करीत नवनिर्मितीव्दारे योग्य आर्थिक पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. असे प्रतिपादन सौराष्ट्र विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. संजय भयाणी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डीतील एस.बी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘जागतिक आर्थिक घडामोडी संदर्भात भारतापुढील आव्हाने व संधी’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शुक्रवारी (दि. 13 जानेवारी 2017) करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विदयमाने झालेल्या या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सौराष्ट्र विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. संजय भयाणी यांच्या हस्ते आणि बिझनेस स्टॅन्डर्ड लिमिटेडचे पुणे विभागीय प्रमुख सुमेध गुप्ते, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त भाईजान काझी, संस्थेचे संचालक डॉ. डॅनिअल पेणकर, संशोधन विभाग प्रमुख डॉ. हंसराज थोरात यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी बिझनेस स्टॅन्डर्ड लिमिटेडचे पुणे विभागीय प्रमुख सुमेध गुप्ते मार्गदर्शन करताना म्हणाले की, आर्थिक घडामोडीमध्ये टिकून राहण्यासाठी व्यवस्थापन शाखेच्या (एमबीए)च्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक नोकरी मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा सुक्ष्मरीतीने अभ्यास करावा त्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेला होणारा फायदा तोटा यावर चिकित्सक पध्दतीने संशोधन केले पाहिजे. यातूनच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन मार्ग सापडतील.
संस्थेचे संचालक डॉ. डॅनिअल पेणकर यांनी प्रास्ताविकात जागतिक स्तरावर 18 व्या शतकापासून घडलेल्या घटना आणि त्याचा इतर देशांवर व भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांचा आढावा घेतला. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्रामधून आंतरराष्ट्रीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते या एैवजी जर उत्पादन शेती, वाहन अशा विविध क्षेत्रांमधून निर्यात वाढली तर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय चलन मिळेल आणि भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होईल. माहिती तंत्रज्ञान आणि संगणक क्षेत्रात जरी जागतिक पातळीवर चढ उतार झाले तरी त्याची झळ आणि दुष्परिणाम कमी होतील. तसेच उत्पादन, शेती, वाहन क्षेत्राला पूरक धोरणे राबविल्यास अल्पशिक्षित व ग्रामीण भागातील मजूरांना मोठ्या प्रमाणात रोजगार निमिर्ती होईल. यातून ग्रामीण व शहरी अर्थकरणातील अंतर कमी होईल शहरी भागातील वाढत्या नागरीकरणामुळे येणारा प्रशासनावरील ताण कमी होईल, असे मार्गदर्शन डॉ. डॅनिअल पेनकर यांनी केले.
दुपारच्या सत्रामध्ये नवी मुंबईतील स्टर्लींग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादप्पा गोंडा यांनी ‘मेक इन इंडिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच गुवाहटी विद्यापीठातील प्रा. डॉ. गौर गोपाल बनीक यांनी ‘ब्रेक्झीटचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम’ याबाबत मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय परिषदेमध्ये 180 विद्यार्थी व संशोधक सहभागी झाले होते. 40 संशोधकांनी संशोधनपर प्रबंध सादर केले. याचे प्रकाशन डॉ. संजय भयाणी, सुमेध गुप्ते, भाईजान काझी, डॉ. डॅनिअल पेणकर, डॉ. हंसराज थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
सुत्रसंचालन प्रा. प्रणिता बुरबुरे, श्रूती राव, आभार अक्षता चंदनकर, डॉ. दिप्ती शर्मा यांनी मानले. या राष्ट्रीय परिषदेमध्ये संस्थेच्या संशोधन विभागामार्फत उपस्थित मान्यवरांच्या शूभहस्ते ग्रामीण विकास 21 व्या शतकातील प्रवाह संधी व आव्हाने या विषयी वरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या राष्ट्रीय परिषदेचे संयोजन एस.बी. पाटील इन्सूटिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संशोधन विभाग प्रमुख डॉ. हंसराज थोरात यांनी केले.
नवनिर्मितीव्दारे आर्थिक पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे…..डॉ. संजय भयाणी
