“गोविंदा आला रे आला…” गाण्यावर थिरकत प्रचिती स्कूलमध्ये गोविंदांनी फोडली दहिहंडी
श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला, दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा
साक्री : राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले… विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी… विविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष… अशा उत्साही वातावरणात साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालचमूंनी दहीहंडीचा आनंद लुटला. गोविंदा आला रे आला… यासारख्या गाण्यावर नृत्य करत चिमुकले दहीहंडी व कृष्णजन्माष्टमी उत्सवात सहभागी झाले होते. यामध्ये चिमुकल्यांसह शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे तसेच शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे आणि पाळण्याचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी कृष्णभजन व पाळणा गीत’ सादर केले. बालचमूंनी राधा – कृष्णाची आकर्षक वेशभूषा केली होती. शाळेच्या आवारातील दहीहंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांनी सुंदर मनोरा बनवत ‘मच गया शोर सारी नगरी रे’, ‘गोविंदा आला रे आला’, ‘बोल बजरंग बली की जय’, या गाण्यावर ठेका धरत वातावरणात रंगत आणली. शिक्षकही यामध्ये सहभागी झाले होते. दहीहंडी फोडताना कार्यक्रमाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बालगोपालांनी एकच जल्लोष करीत दहीहंडी फोडली. शिक्षकांनी विद्यार्थ्याना कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला यांचे महत्त्व सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी विषयावर ग्रीटिंग कार्ड बनवले होते.
संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील म्हणाले, की सारे मतभेद विसरून, लोभ अहंकार बाजूला सारून, सर्वधर्म समभाव जागवत सर्वांनी एकत्रित येऊन आपुलकीची दहीहंडी फोडूया. विद्यार्थ्याना आपल्या सण उत्सवांची माहिती व्हावी, तसेच सण-उत्सवांचा आनंद लुटता यावा, याकरीता दहीहंडी उत्सव आयोजित केला होता, असेही सांगितले.
यानंतर इ.३री तील विद्यार्थी -विद्यार्थीनींनी श्रीकृष्ण जन्मावर आधारीत सुंदर नाटक सादर केले. इ. २ री मधील विद्यार्थी -विद्यार्थीनींनी राधाकृष्ण रासलीला नृत्य सादर केले. बाळ गोपाळांनी मनोरे बनवून दहीहंडी फोडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी गवांदे यांनी केले. राधाकृष्ण रासलीला नृत्याचे संयोजन पूनम पवार व गीतांजली काकूस्ते यांनी केले. श्रीकृष्ण जन्मावर आधारीत नाटक रोहिणी सोनवणे व जागृती जाधव यांनी संयोजन केले. रांगोळी व फलक लेखन व मटकी सजावट किरण गवळी, सविता लाडे, वैष्णवी देवरे, सविता ठाकरे, भूपेंद्र साळुंके, दिपमाला आहिरराव यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्वेता सोनवणे, दिपमाला अहिरराव यांनी केले.
























