“बैलपोळा” सण साजरा करून प्रचिती इंटरनॅशनल स्कूलने जोपासली महाराष्ट्राची संस्कृती
साक्री :- “पिठोरी अमावस्या”आणि “बैलपोळा” या सणाचे औचित्य साधत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री यांच्या वतीने महाराष्ट्राची संस्कृती बैलपोळा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या बैलपोळा सणाच्या पूजेचा मान शेतकरी दगडू मोरे, रा. कावठे यांना देण्यात आला.
स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते शेतकऱ्याची व बैलांची आरती ओवाळून पूजन करण्यात आले. त्यानंतर, सर्जा राजांना पुरण पोळी व गोड नैवद्य भरविण्यात आला. बैलपोळा सणाविषयी इ.७ वी मधील जिज्ञासा शिरसाठ या विद्यार्थ्यांनीने भाषण केले. दरवर्षी श्रावण अमावस्येच्या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व तेलंगणा या सीमावर्ती भागात सुद्धा हा सण साजरा होतो. आपला बैल उठून दिसावा, यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीनुसार त्याचा साज शृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या खेडेगावातील प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या बरोबर काम करणाऱ्या बैलाची पूजा केली जाते. स्वादिष्ट व्यंजन बनवून त्याचा आस्वाद दिला जातो. यासोबत या दिवशी बैलांना सजविण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते. पोळा सणाची शहरापासून ते गावापर्यंत धूम असते. परंतु, या सणाचे विशेष आकर्षण गावांमध्येच पाहावयास मिळते. गावातील शेतकरी सकाळपासून बैलाच्या तयारीला सुरुवात करतात. सकाळी लवकर उठून बैलांना आंघोळ घालतात. त्यानंतर त्यांना सजवून त्यांची पूजा केली जाते. घरातील महिला स्वादिष्ट व्यंजन पुरणपोळी शिरा बनवतात, या दिवशी बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. ज्यांच्या घरात बैलजोडी नसते ते लोक मातीपासून बनवलेल्या बैलाचे पूजन करतात. बैलाचा सण शेतीवर आधारित आहे. हा सण आपल्या बैलांचे व शेतीचे तसेच शेतकऱ्याच्या कामी येणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व सांगतो. निसर्ग, मनुष्य व सर्व प्राणीमात्रांमध्ये देव आहे. त्याची पूजा हीच देवाची पूजा होय. याची जाणीव हा सण आपणास करून देतो. भारतीय संस्कृती मनुष्यासोबत निसर्ग आणि प्राणीमात्रांची देखील पूजा करावयाला शिकवते, असे विचार भाषणातून विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ८ वी मधील आश्विनी पाटील व करूणा भदाणे या विद्यार्थ्यांनींनी केले. कार्यक्रमाची सुंदर सजावट किरण गवळी, दिपमाला अहिरराव यांनी केले. संयोजन जागृती जाधव यांनी केले होते. परंपरागत संस्कृतीप्रमाणे सुंदर असा कार्यक्रम पार पडला.