प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी दिले शिक्षणाचे धडे
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशा परिधान करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. या कार्यक्रमात सर्वप्रथमतः शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते माता सरस्वती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या गुरुवंदनेचे गायन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेचे अध्यक्ष, प्राचार्य, उपप्राचार्य, शाळा समन्वयक व सर्व शिक्षक-शिक्षिका यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिक्षक दिनाविषयी भाषणाला सुरुवात झाली. ” 5 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी शिक्षक दिन व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ साली तामिळनाडू राज्यात झाला होता. प्राथमिक शिक्षण तिरूपतीच्या लुथेरन मिशन स्कूल येथे स्थानिक शाळेत पार पडले. त्यानंतर पदवीचे शिक्षण मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून घेतले. ते भारताचे प्रथम उपराष्ट्रपती व द्वितीय राष्ट्रपती झाले. ते एक थोर विध्दवान विचारवंत होते. त्याचबरोबर त्यांची एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून देखील देशाला ओळख आहे. त्यांनी जगाला विद्यालय मानले होते. त्याचे म्हणणे होते की, शिक्षणाव्दारेच मानवाच्या मस्तिष्काचा विकास केला जाऊ शकतो. अशा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ओळख एक प्रमुख शिक्षणतज्ञ म्हणून झाली. ज्यामुळे त्यांना भारत आणि त्यापलीकडेही उच्च स्तरावर सन्मान मिळाला. दूरदर्शी विचारवंत आणि राजकारणी म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत असतो. म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस शिक्षकाच्या कर्तृत्वाबद्दल सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. गुरु आणि शिष्य यांच्या बद्दल हा महत्त्वाचा दिन असून या दिवशी शाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव देखील केला जात असतो. “अक्षर अक्षर शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून ज्ञानाचा मार्ग दाखविला”. असे मार्गदर्शन गणेश नांद्रे व अश्विनी ठाकरे यांनी केले.तसेच शाळेमध्ये कार्यक्रमाचे जेव्हा आयोजन करण्यात आले. त्यावेळेस शाळेतील शिक्षकांना वेगवेगळ्या भेट वस्तू देऊन शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी त्यांचा सन्मान केला. ते म्हणाले की, शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार मानला जातो. विद्यार्थ्यांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेत असतो. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास शिक्षक आपल्या विचारांनी करत असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्व शिक्षक-शिक्षिका यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षिकांची भूमिका साकारून या ठिकाणी वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल,चित्रकला या विषयांचे प्रत्यक्ष वर्गात जाऊन अध्यापन केले. विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिल्यांदा एक दिवस शिक्षक होण्याचा मान त्यांना मिळाला आणि शिक्षकाच्या भूमिकेचे महत्व त्यांना कळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुश्री बदामे, धनश्री देवरे, तुषार सुर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे संयोजन वैशाली खैरनार, प्रफुल्ल साळुंके यांनी केले. तर कार्यक्रमाची उत्तम सजावट किरण गवळी, दिपमाला अहिरराव व भूप्रेंद्र साळुंके यांनी केली.