प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या बाल आनंद मेळाव्यात राजश्री पाटील ठरल्या “होम मिनिस्टर” ; साक्री तालुक्यात प्रथमच मेळाव्याचे आयोजन
विद्यार्थी पालकांसह हजारो नागरिकांनी मेळाव्यात नोंदविला उत्स्फूर्त सहभाग; मेळाव्यात 15 लाखाहून अधिक उलाढाल
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे आयोजित आनंद मेळाव्यात घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात येथील राजश्री पाटील या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून “बाल आनंद- मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी मज्जा मस्ती केली. साक्री तालुक्यात प्रथमच आयोजित या आनंद मेळाव्यात खेळ, पदार्थ खरेदी विक्रीतून 15 लाखाहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांना बाजार पेठेचे महत्त्व समजण्यासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थी पालकांसह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात इ.१ली. ते १०वी. पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या माता-भगिनी महिलां साठी “होम मिनिस्टर” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले खान्देश फेम अभिनेता सचिन कुमावत खान्देश क्वीन अभिनेत्री पुष्पा ठाकूर विनोदी अभिनेता विलासकुमार शिरसाठ, कवी व अभिनेता संदीप साकोरे उपस्थित होते. कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, कलेची देवता नटराजन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता विलासकुमार शिरसाठ यांच्याद्वारे महिलांसाठी आयोजित केलेल्या “होम मिनिस्टर” कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. “होम मिनिस्टर” कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालकांनी नोंदणी करीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विनोदी कलाकार विलासकुमार शिरसाठ यांनी विविध मजेशिर प्रश्न विचारून कार्यक्रमात रंगत आणली. या प्रश्नांना उत्तरे देत महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. याप्रसंगी, रिंग, तळ्यात -मळ्यात, बकेट बॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा रंगल्या.
या खेळात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राजश्री पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक धनश्री सोनवणे आणि तृतीय क्रमांक विजया पाटील यांनी मिळविला.
खान्देश फेम अभिनेता सचिन कुमावत खान्देश क्वीन अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांच्या हस्ते प्रथम विजेत्या राजश्री पाटील यांना पैठणी साडीचे प्रथम बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या हस्ते द्वितीय विजेत्या धनश्री सोनवणे यांना सेमी पैठणी देवून सन्मानित करण्यात आले. तर, कवी-अभिनेता संदीप साकोरे व सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता विलासकुमार शिरसाठ यांच्या हस्ते तृतीय विजेत्या-विजया पाटील यांना सेमी पैठणी साडीचे तृतीय बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मनसोक्त आनंद लुटला. सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, ड्रायव्हर बंधू या सर्वांच्या सहकार्याने बाल आनंद मेळावा कार्यक्रम मोठ्या आनंद उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे संयोजन श्वेता सोनवणे, पुनम पवार, सविता ठाकरे यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या उत्तम सूत्रसंचालनाची जबाबदारी स्मिता नेरकर यांनी पार पाडली.