प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी
साक्री:- प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी, शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, शाळेचे समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे, श्रावण अहिरे यांच्या हस्ते माता सरस्वती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी, तनिष्का काकुस्ते, हेमांगी गांगुर्डे, प्रणिती गांगुर्डे, वेदिक्षा पानपाटील, प्रणिती बोराळे, स्वरा सोनवणे, गौरवी सोनवणे, तन्वी सोनवणे, निधी सदाना, आराध्या ठाकरे (इ.५वी), वृषाली बोरसे, हिना अहिरे (इ.६ वी ब) हेताक्षी पवार, सिद्धी जाधव, पलक पानपाटील ( इ.८ वी) निलिमा पाटील ( इ.१०वी.), श्रेयांश बदामे ( इ.३ री.), चैतन्य बेडसे (इ.५ वी.) या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथील एका दलित कुटुंबात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते एम. ए. साठी ते अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन तेथे त्यांनी पीएच.डीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून एम.एससी.डी.एससी तर ग्रेज इन येथून बॅरिस्टर-एट-लॉ हि पदवी घेतली. ते भारतातील त्या काळातील सर्वात सुशिक्षित लोकांपैकी एक होते. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून “डॉक्टरेट पदवी” घेणारे पहिले भारतीय होते.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित आणि समाजातील मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी वाहून घेतले. ते संपूर्ण आयुष्य दुबळ्या लोकांच्या हक्कासाठी लढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले कायदामंत्री झाले. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांनी अनेक देशांशी सल्ला मसलत केली. राज्यघटनांचा अभ्यास करून संविधानाचे जनक आणि राज्यघटनेचे निर्माते म्हटले त्यांना संबोधले जाते. ते एक महान अर्थशास्त्रज्ञही होते. आंबेडकरांनी केवळ दलित वर्गासाठीच नव्हे तर महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी ही लढा दिला.
आज आपण बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात अमलात आणण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे . असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतून व्यक्त केले. त्यानंतर कुणाल पानपाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्च केले. ते एक प्रख्यात अर्थतज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा दिला नाही, तर महिला सक्षमीकरणासाठी ही बाबासाहेबांनी खूप काम केले.
डॉ. बाबासाहेबांनी महिलांचे समान हक्क, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयी लोकांना जागृत केले. बाबासाहेब म्हणायचे की मी स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजित असतो. त्याच्या या पुरोगामी विचारांमुळे ते आज कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणा स्रोत आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश आज त्यांचे स्मरण करत आहे. देशाच्या या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन करून त्यांनी विचार मांडले.
या कार्यक्रमाची सजावट, फलक लेखन व रांगोळी रेखाटन मनोज भिल, जितेंद्र कासार, भूपेंद्र साळुंखे, दीपमाला आहिरराव, सविता लाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राजपूत यांनी केले. संयोजन श्रावण आहिरे यांनी केले.


















