पिंपरी (दि. 18 जानेवारी 2017) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज भरणा-या उमेदवारांसाठी महानगरपालिकेने एक खिडकी योजना सुरु करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.
फेब्रुवारी महिण्यात पिंपरी चिंचवड मनपाच्या 32 प्रभागात एकूण 128 जागांसाठी निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये अर्ज भरुन इच्छिणा-या उमेदवारांना मनपा कडून विविध विभागांची ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घ्यावे लागते. ज्याप्रमाणे निवडणूक विभागाने या निवडणूकीत अर्ज भरण्यासाठी सर्व उमेदवारांना ऑन लाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याप्रमाणे विविध विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करावी.
उमेदवारांना करसंकलन व पाणी पट्टी, वैद्यकीय, अग्निशामक, अतिक्रमण या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. या सर्व प्रक्रियांसाठी उमेदवारांचा वेळ व पैसा खर्च होतो. यातून भ्रष्टाचारास चालना मिळते हे टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने एक खिडकी योजनेव्दारे हि सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. अशी मागणी सचिन साठे यांनी आयुक्त व निवडणूक विभागाकडे केली आहे.
तसेच या निवडणूकांसाठी करण्यात आलेल्या 32 प्रभागातील रचनेमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्या देखिल आयुक्त व निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. जसे की प्रभाग क्रमांक 25 मध्ये राहणा-या सुमारे साडेतीन हजारांहून जास्त मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 26 मधिल मतदार यादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत रितसर हरकत निवडणूक विभागाकडे मुदतीत घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here