पिंपरी पोलीसात नगरसेवक डब्बू आसवानी यांनी केला गुन्हा दाखल
पिंपरी :- पिंपरीचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त विनापरवानगी बेकायदेशीर फ्लेक्स, बँनर लावल्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी नगरसेवक, माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी याप्रकरणी किशोर केसवाणी (रा.पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०१९ रोजी पिंपरी कँम्प परिसरात किशोर केसवाणी मित्र परिवाराने बेकायदेशीर, विनापरवानगी फ्लेक्स व बँनर लावले होते. आमदार गौतम चाबुकस्वार यांचा वाढदिवसानिमित्त व किशोर केसवाणी यांना शिवसेना व्यापारी सेल, पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध ठिकाणी जाहिरात करण्यासाठी हे फ्लेक्स आणि बँनर लावण्यात आले होते. या बेकायदेशीर फ्लेक्समुळे शहर विद्रुपीकरण झाले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २८४,२४५ अंतर्गत मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३, ४ अन्वये केसवाणी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
विधानसभेची निवडणुक अवघ्या २८ दिवसांवर येऊन ठेपली असताना पिंपरी कँम्पातील राजकीय वातावरण पेटले आहे. आमदार गौतम चाबुकस्वार आणि नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा संघर्ष आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.