डॉ. आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन; शहराच्या विविध भागात चोख पोलिस बंदोबस्त
राष्ट्रवादीच्या बंदला व्यापारांचा प्रतिसाद
पिंपरी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्त वसुली संचलनालयाने शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी बंदची हाक दिली होती. त्याला पिंपरी चिंचवडकरांनी समिश्र प्रतिसाद दिला. शहरातील अनेक भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात होते.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारवाईचा आरोप…
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने कारवाई केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे. या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शहर बंदची हाक दिली होती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यापारी, परिसरातील नागरिकांना बंदचे आवाहन केले गेले. नागरिकांकडून त्याला काही ठिकाणी प्रतिसाद देत बंद पाळला. पिंपरी कॅम्प, निगडी, प्राधिकरण, पिंपळेसौदागर, सांगवी, डांगे चौक, थेरगाव, नेहरूनगर, भोसरी, संत तुकारामनगर आदी भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली. तर काही भागातील दुकाने चालू होती. त्यामुळे बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
शहरात राष्ट्रवादीचा मोर्चा…
दरम्यान शहराच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात आला. पिंपरीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवणी, नगरसेविका निकिता कदम, संत तुकारामनगर, वल्लभनगरमध्ये माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा धर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख, डांगे चौकात युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपळे सौदागरमध्ये विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मोर्चा काढला होता.
भाजपाकडून बंदला असहकार…
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शिखर बँकेच्या कथित गैरव्यवहराप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या बंदला भाजप समर्थकांनी न जुमानता आपले व्यावसाय सुरूच ठेवल्याचे शहराच्या विविध भागात पहायला मिळाले. दरम्यान, हा बंद दुपारी दोनपर्यंत असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. मात्र, भाजप समर्थक व्यावसायिकांनी बंदला असहकार करत आपली दुकाने सुरू ठेवली.
काळेवाडीत बंदला प्रतिसाद…
काळेवाडीतही नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे व नगरसेविका उषा काळे यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे पुष्पळ व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली. मात्र, अनेकांनी बंदला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, राज्यात आचारसंहिता सुरू असून विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शहराच्या विविध भागात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.