मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची पत्रके, हस्तपत्रक, घोषणाफलक वा भित्तीपत्रके या प्रचार साहित्यावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव आणि पत्ता नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या र्निबधांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांना सहा महिने कारावास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
येत्या २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. या प्रचार साहित्याबाबत निवडणूक आयोगाने काही र्निबध घातले आहेत. ‘लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१’च्या कलम १२७ क नुसार निवडणूक पत्रकांची छपाई आणि प्रसिद्धीवर र्निबध घालण्यात आले आहेत. राजकीय पक्ष, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आणि मुद्रणालयांचे चालक व मालकांवर हे र्निबध घालण्यात आले आहेत. राजकीय पक्ष वा उमेदवाराला प्रपत्रके, हस्तपत्रके, घोषणा फलक अथवा भित्तीपत्रके आदी उपलब्ध करणारे मुद्रक वा प्रकाशकाला आपले नाव आणि पत्ता त्यावर प्रकाशित करावा लागणार आहे. तसे न केल्यास संबंधितांना सहा महिने कारावास वा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागणार आहेत.